स्वतंत्र पेठ तालुक्याची स्थापना करा : पाटील
By Admin | Updated: November 14, 2014 23:22 IST2014-11-14T23:09:21+5:302014-11-14T23:22:50+5:30
वाळवा पं. स. सभा : सभापतींचा नकार

स्वतंत्र पेठ तालुक्याची स्थापना करा : पाटील
इस्लामपूर : वाळवा तालुक्याचा समतोल विकास साधण्यासाठी शिराळा विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या आणि विकासापासून दुर्लक्षित राहिलेल्या ४८ गावांचा स्वतंत्र पेठ तालुका करा, अशी खळबळजनक मागणी पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी केली. मात्र सभापती रवींद्र बर्डे यांनी सभागृह या मागणीशी सहमत नाही असे म्हणून नकार दर्शवला.
पंचायत समिती सभागृहात आज (शुक्रवारी) सभापती बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत सभा झाली.
पेठच्या प्रकाश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चर्चेवेळी तालुक्यातील रस्ते, त्यांची कामे, अधिकाऱ्यांवर पडणारा ताण असे मुद्दे मांडत, त्या ४८ गावांचा विकास रखडला आहे, चार जिल्ह्यांचे मध्यवर्ती केंद्र आहे. पूर्वी तेथे सर्व व्यवस्था उपलब्ध होत्या. कडेगाव, पलूसचा तालुका होतो, तर मग तसाच या ४८ गावांचाही पेठ तालुका करा, अशी जोरदार मागणी करत तसे निवेदन सभापती बर्डे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यावर बर्डे यांनी सभागृह या मागणीशी सहमत नाही असे सांगत पाटील यांच्या विषयाला नकार दर्शवला.
आरोग्य विभागावरील चर्चेवेळी शहरात डेंग्यूची साथ नसल्याचा निर्वाळा डॉ. श्रीकांत भोई यांनी दिला. त्यावेळी सुभाष पाटील (नेर्ले) यांनी, खासगी रुग्णालयात रुग्ण जातात याकडे लक्ष वेधले. मात्र डॉ. भोई यांनी त्याला नकार दिला. पं. स. आरोग्य विभागाच्या डॉ. अशोक सुतार यांनी मात्र असे रुग्ण आहेत हे मान्य करुन त्याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
पंचायत समितीचे बांधकाम अभियंता आर. पी. चव्हाण यांनी, गरजेनुसार मंजूर असलेली तीन कोटींची ७५ विकासकामे शासनाची स्थगिती असल्याने सुरु करता येत नाहीत, अशी माहिती सभागृहाला दिली. सभेतील चर्चेत प्रीती सूर्यगंध, प्राजक्ता देशमुख, भारती कदम यांनीही भाग घेतला. (वार्ताहर)