कोरोना उपचारासाठी शासकीय यंत्रणा उभी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:50+5:302021-04-07T04:27:50+5:30

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शासकीय यंत्रणा उभी करा, अशी मागणी आमदार ...

Establish a government mechanism for corona treatment | कोरोना उपचारासाठी शासकीय यंत्रणा उभी करा

कोरोना उपचारासाठी शासकीय यंत्रणा उभी करा

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शासकीय यंत्रणा उभी करा, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री जयंत पाटील यांना मेलद्वारे व जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांची भेट घेऊन आमदार गाडगीळ यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक ३६० रुग्णसंख्या सोमवारी नोंदली गेली. येत्या पंधरा दिवसांत रुग्णसंख्या वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच कोरोनाशी लढा देण्यास सज्जता ठेवली पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन यांना सूचना देऊन त्याचे नियोजन तातडीने करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नव्हता. मात्र, यंदा मार्चपासूनच कोरोनाची महामारी वेगाने पसरत आहे. गेल्यावर्षी जुलैनंतर कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागल्यावर प्रशासनाची धावपळ झाली होती. त्यावेळी कोट्यवधी रुपये खर्चून जिल्हा प्रशासनाने क्रीडा संकुलमध्ये तसेच महापालिका प्रशासनाने आदीसागर मंगल कार्यालयात कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. तेथे ऑक्‍सिजनची सुविधा केली. पण, ऐनवेळी व्हेंटिलेटर्सची उपलब्धता नव्हती. शिवाय रुग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला पुन्हा तेथून खासगी रुग्णालयात हलविण्याची वेळ येत होती. या त्रुटी दूर करून या सेंटरमध्येच अत्यावश्‍यक यंत्रणा उभी करावी. तज्ज्ञांनी येत्या काही दिवसांत कोरोनाची लाट वेगाने वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता गेल्या वर्षी झालेल्या चुका टाळण्यासाठी आतापासूनच प्रशासनाने प्रयत्न करावा.

शासनाने आरटीपीसीआर तसेच अँटीजेन चाचण्यांचे दर कमी केले ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, रुग्णांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागू नयेत यासाठी उपचाराचे दर कमी करावेत, अशी मागणी केली. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, सचिव विश्वजीत पाटील, गणपती साळुंखे, मकरंद म्हामुलकर उपस्थित होते.

Web Title: Establish a government mechanism for corona treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.