सांगली : जिल्ह्यात असलेल्या विविध उद्योग, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कोरोना संसर्ग झाल्यास तातडीने उपचारांसाठी उद्योजक संघटनांनी कोविड केअर सेंटर उभारण्यास प्राधान्य द्यावे, तसेच बाधित कामगारांच्या कुटुंबांसाठीही आयसोलेशन सेंटर उभारून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
जिल्ह्यातील उद्योगांमध्ये कोरोना सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. चाैधरी म्हणाले, कारखान्यात कार्यरत असलेल्या कामगारांना सुविधा देण्यासाठी उद्योजक संघटनांनी लसीकरणावर भर द्यावा. कामगारांना लसीकरण करण्यासाठी खासगी लसीकरण उत्पादकांशी संपर्क साधून कोविड रुग्णांलयाशी संलग्न होऊन लसीकरणाची मोहीम राबविल्यास त्याचा फायदा हाेणार आहे.
उद्योजक संघटनांनी सीएसआर फंडातून कोविडच्या पार्श्वभूमीवर साहित्य पुरविण्यासाठी मदत करावी. संघटनेकडून आरटीपीसीआर चाचणीसाठी मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा असून, जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची मागणी आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी ऑक्सिजन प्लाँट उभा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, व्यवस्थापक विद्या कुलकर्णी, विविध उद्योग संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.