उद्योजक जयंत महाबळ यांचे अपघातात निधन
By Admin | Updated: June 20, 2014 00:36 IST2014-06-20T00:34:30+5:302014-06-20T00:36:47+5:30
चालक जखमी : मोटारीला ट्रकने ठोकरले

उद्योजक जयंत महाबळ यांचे अपघातात निधन
मिरज : मिरजेतील उद्योजक व ज्येष्ठ मुद्रण व्यावसायिक जयंत प्रभाकर महाबळ (वय ५७) यांचे तुळजापूर-लातूर रस्त्यावर मोटार अपघातात निधन झाले. त्यांच्या मोटारीचे चालक काकासाहेब मल्लाप्पा पुजारी (४०) अपघातात जखमी झाले.
जयंत महाबळ बुधवारी रात्री मोटारीतून (एमएच १०, बीए ५८५८) नागपूरला निघाले होते. तुळजापूरच्या पुढे खंडाळा गावाजवळ त्यांच्या मोटारीला ट्रकने समोरून ठोकरल्याने महाबळ यांचा जागीच मृत्यू झाला. महाबळ यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच मिरजेतील त्यांच्या निकटवर्तीयांनी आज, गुरुवारी सकाळी तुळजापूरकडे धाव घेतली. दुपारी त्यांचे पार्थिव मिरजेत आणण्यात आले. कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सांगली, मिरज परिसरातील राजकीय, सामाजिक, कार्यकर्ते, नागरिक मोठ्यासंख्येने
उपस्थित होते. मिरजेतील गजानन प्रिंटिंग प्रेसचे मालक जयंत महाबळ यांचा शहरातील विविध संस्था, संघटनांशी निकटचा संबंध होता. ते उत्कृष्ट कबड्डीपटू व भानू तालीम क्रिकेट संघटनेचे तालुकाध्यक्ष होते.
भानू तालीम संस्था, मिरज विद्या समितीचे माजी संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९५२ पासून मुद्रण व्यवसायात लौकिक मिळविणाऱ्या वडील प्रभाकर महाबळ यांचा वारसा त्यांनी चालविला होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अपघातात जखमी चालक काकासाहेब पुजारी यास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)