‘टेंभू’च्या अभियंत्याला लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST2021-03-13T04:50:18+5:302021-03-13T04:50:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : तलाव दुरुस्तीच्या बिलापोटी ४० हजारांची लाच घेताना पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक ...

‘टेंभू’च्या अभियंत्याला लाच घेताना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तलाव दुरुस्तीच्या बिलापोटी ४० हजारांची लाच घेताना पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कडेपूर (ता. कडेगाव) येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. नितीश निवृत्ती सुतार (वय २८) असे त्याचे नाव आहे.
संशयित कनिष्ठ अभियंता नितीश सुतार ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील टेंभू योजनेच्या कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारदारांच्या तलाव दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर करून बिलाची रक्कम खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात आणि पुढील कामात त्रास न देण्यासाठी सुतारने दहा टक्के रकमेची मागणी केली होती. तक्रारदारांनी याबाबत १० फेब्रुवारी रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. ही रक्कम कडेपूर (ता. कडेगाव) येथील कार्यालयात आणून देण्यास सांगितले होते.
त्यानुसार शुक्रवारी कडेपूर येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी नितीश सुतार याला तडजोडीअंती ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, कर्मचारी संजय संकपाळ, अविनाश सागर, सलीम मकानदार, सुहेल मुल्ला, भास्कर भोरे, प्रीतम चौगुले, सीमा माने, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.