सांगली : शेतातील ऊस तोडला, या क्षुल्लक कारणावरुन पुतण्या दिगंबर वास्कर फडकरी याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याप्रकरणी अंकली (ता. मिरज) येथील त्याचा चुलता, चुलती व चुलत भावा-बहिणीस दोषी धरुन सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजाराची दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. आर. यादव यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील एस. एम. पखाली यांनी काम पाहिले. नरहरी सुब्राव फडकरी (वय ६३), त्याची पत्नी मंगल (५५), मुलगा राहुल (२२) व मुलगी बबीता (२०) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी नरहरी व त्याचा पुतण्या दिगंबर यांचे शेत लागूनच होते. दोघांनी शेतात ऊस केला होता. नरहरीने साखर कारखान्याला ऊस घातला होता, दिगंबरचा ऊस गेलेला नव्हता. दिगंबरच्या उसाचा पाला नरहरीच्या शेतातील हद्दीत गेला होता. यामुळे त्याने ऊस कापून टाकला होता. त्यामुळे दिगंबरने, आमच्या शेतातील ऊस का कापला? असा नरहरीला जाब विचारला. यातून त्यांच्यात वाद झाला. नरहरीने पत्नी व मुलांच्या मदतीने दिगंबरवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्याची आई शांताबाई या मारामारी सोडविण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संशयितांनी त्यांच्यावरही हल्ला केला होता. २८ नोव्हेंबर २००७ रोजी ही घटना घडली होती. (प्रतिनिधी)
कुटुंबातील चौघांना सक्तमजुरी
By admin | Updated: August 18, 2014 23:56 IST