राष्ट्रवादीची उद्या तातडीची बैठक
By Admin | Updated: March 12, 2015 00:04 IST2015-03-11T23:42:25+5:302015-03-12T00:04:49+5:30
तासगाव-कवठेमहांकाळ पोटनिवडणूक : शिवसेना पदाधिकारी मुंबईला, भाजपचे तळ्यात-मळ्यात

राष्ट्रवादीची उद्या तातडीची बैठक
सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, आज, बुधवारी राजकीय हालचाली गतिमान झाल्या. राष्ट्रवादीने शुक्रवारी १३ मार्च रोजी तासगाव येथे तातडीची बैठक आयोजित केली असून, त्यामध्ये उमेदवारीविषयी चर्चा केली जाणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारीही तातडीने मुंबईला रवाना झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत. भाजपचे अजूनही तळ्यात-मळ्यात असून बैठकीचे कोणतेही नियोजन त्यांनी केले नाही. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या मतदारसंघाची पोटनिवडणूक मंगळवारी जाहीर झाली असून आठवडाभरात निवडणुकीची प्रक्रियाही सुरू होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने शुक्रवारी दुपारी एक वाजता तासगाव येथील एका मंगल कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधील पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार असून, उमेदवार कोण असावा, याविषयीची चर्चा होणार आहे.
पक्षाचे निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक होणार आहे. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन यापूर्वीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही बिनविरोधला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू असून, शिवसेनेचा निर्णय येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. भाजपने याविषयी अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही. स्थानिक नेत्यांनीही पक्षाच्या कोअर कमिटीवर निर्णय सोपविला आहे. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी, भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी भूमिका प्रदेशाध्यक्षांकडे मांडली आहे, तर खासदार संजय पाटील यांनी, पक्षाची समितीच याबाबत निर्णय घेईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीविषयीचा निर्णय जाहीर करतील. आम्ही उद्या (गुरुवारी) त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत. त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू.
- आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना
काँग्रेसकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणती अडचण येईल, असे वाटत नाही. पक्षाच्या नेत्यांमध्ये याबाबत एकमत आहे. प्रदेश कार्यकारिणीकडे आम्ही याबाबतची मागणी करणार आहोत. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होईल.
- आ. पतंगराव कदम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, आम्ही ही निवडणूक लढविणार नाही. बाळा नांदगावकर यांनीही याबाबतची भूमिका जाहीर केली आहे. उमेदवार उभा न करता आम्ही आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहणार आहोत.
- तानाजी सावंत, जिल्हाध्यक्ष, मनसे
तासगाव-कवठेमहांकाळच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी पार पडल्यानंतर उमेदवारीबाबतचा अहवाल आम्ही प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविणार आहोत. त्यानंतर तातडीने उमेदवार जाहीर होईल. बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा आहे.
- विलासराव शिंदे, पक्षीय निवडणूक निरीक्षक, राष्ट्रवादी