कुपवाडच्या महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेत अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:57+5:302021-02-05T07:29:57+5:30
सांगली : कुपवाड येथील महालक्ष्मी मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांकडून वसुली केलेल्या ३५ हजार रुपयांच्या रक्कमेचा अपहार झाला आहे. ...

कुपवाडच्या महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेत अपहार
सांगली : कुपवाड येथील महालक्ष्मी मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांकडून वसुली केलेल्या ३५ हजार रुपयांच्या रक्कमेचा अपहार झाला आहे. याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लेखापरीक्षक अनिल सचितानंद पैलवान (वय ५१, रा. गर्व्हमेंट काॅलनी) यांनी फिर्याद दिली आहे.
संस्थेचे अध्यक्ष भीमराव गोविंदराव पाटील, मानद सचिव बबन आनंदा बनसोडे, सचिव इकबाल बंडू म्हेतरे-मुलाणी (सर्व रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कुपवाड परिसरात १९६१ मध्ये महालक्ष्मी मालकी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाली होती. या संस्थेबाबत उपनिबंधकांकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार अनिल पैलवान यांची लेखापरीक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. पैलवान यांनी १९६१ पासूनच्या कागदपत्रांची तपासणी केली. या संशयितांनी संगनमताने सभासदांचे बेकायदेशीर ठराव केले. दस्ताऐवज तयार करून संस्थेतील सहा प्लॉट हितसंबंधित लोकांना विक्री केली. ३५ हजार ३६७ रुपये इतक्या सभासद वसुली रक्कमेत अपहार करण्यात आला तसेच संस्थेची मिळकत मालमत्तापत्रकावरून गायब करून सभासदांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार पैलवान यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फसवणुकीसह विविध कलमांनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.