अकरा वर्षांनंतर महापालिकेला मिळाले अतिरिक्त आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:59+5:302021-06-21T04:18:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दत्तात्रय गणपतराव लांघी यांची शासनाने नियुक्ती केली. सध्या ते अहमदनगर येथे ...

अकरा वर्षांनंतर महापालिकेला मिळाले अतिरिक्त आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी दत्तात्रय गणपतराव लांघी यांची शासनाने नियुक्ती केली. सध्या ते अहमदनगर येथे जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहेत. पदोन्नतीने त्यांची बदली करण्यात आली. सोमवारी ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत.
लांघी हे १९९८ साली शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी धामणगाव, रहिमतपूर, आळंदी, दौंड, इंदापूर, बार्शी येथे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे, तसेच नगररचना विभागाचे सहायक संचालक, पुणे येथे जिल्हा प्रशासन अधिकारी, सातारा येथे जिल्हा प्रकल्प अधिकारी या पदावरही ते कार्यरत होते. अहमदनगर येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला. त्यांची पदोन्नतीने सांगली महापालिकेकडे अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती झाली आहे. लांघी हे सोमवारी पदभार घेण्याची शक्यता आहे.
गेली अकरा वर्षे अतिरिक्त आयुक्त पदावर कुणाचीच नेमणूक झाली नव्हती. तत्पूर्वी या पदावर यशवंत माळी यांची नियुक्ती करण्यात आली होती. माळी यांनी २००६-०७ मध्ये विशेष बाब म्हणून नियुक्तीचे पत्र आणले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिकामेच होते. ड वर्ग महापालिकेत अतिरिक्त आयुक्त हे नवे पद निर्माण केल्यानंतर शासनाकडून झालेली ही पहिलीच नियुक्ती आहे.
चौकट
कार्यालयाच शोध
महापालिकेच्या आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्त हे पद आहे; पण बरीच वर्षे ते रिकामे असल्याने अतिरिक्त आयुक्तांसाठी पालिका मुख्यालयात स्वतंत्र कार्यालय नाही. माळी यांचे अतिरिक्त आयुक्तांचे कार्यालय नंतरच्या काळात सत्ताधारी गट नेत्यांना देण्यात आले. त्यामुळे आता लांघी यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय करावे लागणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू झाला आहे.