बिबट्याने फोडले अकरा महिन्यांच्या बालकाचे नरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:54+5:302021-02-23T04:41:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथे सोमवारी भरदुपारी बाराच्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड ...

बिबट्याने फोडले अकरा महिन्यांच्या बालकाचे नरडे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथे सोमवारी भरदुपारी बाराच्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराच्या अकरा महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला. सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव, ता. माजलगाव, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागामार्फत या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून तसेच वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, तडवळे गावातील सिद्धेश्वर मंदिराजवळील अंत्रीच्या शिवारातील कृष्णात शामराव पाटील यांच्या उसाची तोड सुरू होती. यासाठी शमशुद्दीन शेख हे ऊसतोड मजूर पत्नी, चार वर्षाची अमिना व मुलगा सुफीयानसह आले होते. तेथे पाच कुटुंबातील महिला-पुरुष ऊस तोड करत होते.
दुपारी अकराच्या दरम्यान या सर्वांनी शेताजवळच्या मोकळ्या जागेतील झाडाखाली बसून जेवण केले. याच ठिकाणी सुफीयानसह दोन मुलांना बसविले. सुफीयानला उसाच्या कांड्या करून खाण्यास दिल्या. इतर दोन मुले थोडी मोठी असल्याने इतरत्र खेळत होती.
दुपारी बाराच्या दरम्यान शेजारी उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने संधी साधून सुफीयानच्या नरड्याला पकडून उसात धूम ठोकली. ही घटना सुफीयानच्या वडिलांनी पहिली व आरडाओरडा केला. यावेळी सर्वच ऊसतोड कामगारांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे तीनशे फुटावर बिबट्या बालकाला टाकून पळून गेला. जखमी बालकाला ऊसतोड कामगारांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. पोलीसपाटील वैशाली पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली. उपजिल्हा रुग्णालय येथे नागरिकांनी गर्दी केली होती. या परिसरात वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, उपवनसंरक्षक पी. बी. ढाणके, वनसंरक्षक चंद्रकांत देशमुख, देवकी तहसीलदार, प्रकाश पाटील, बाबा गायकवाड, संपत देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली. आमदार मानसिंगराव नाईक यांनी विश्वास साखर कारखान्याकडून या कुटुंबास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
चौकट
लक्ष ठेवून बालकाला पळवले
शमशुद्दीन शेख यांना चार वर्षांनी अमिना ही मुलगी व सुफीयान ही दोन मुले असून, सुफीयानला नुकतेच दात आले होते. त्यामुळे त्याला उसाचे तुकडे करून दिले होते. तो ऊस चघळत झाडाखाली सावलीत बसला होता. सोबतची दोन मुले खेळत खेळत लांब गेली. याचा फायदा घेऊन बिबट्याने नरड्याला पकडून सुफीयानला पळवून नेले.
सलग तीन दिवस तिघांवर हल्ला
शनिवारी (दि. २०) याच परिसरात रहीम शेख या ऊसतोड कामगाराच्या बारा वर्षाच्या मुलावर, तर रविवारी (दि. २१) विकास पाटील या शेतकऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला होता. हे दोघे वाचले, मात्र सोमवारी तिसऱ्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात सुफीयानचा मृत्यू झाला. हे तिन्हीही हल्ले दुपारी बाराच्या दरम्यान झाले.