वीज कोसळून दोन ठार

By Admin | Updated: May 12, 2017 23:51 IST2017-05-12T23:51:06+5:302017-05-12T23:51:06+5:30

वीज कोसळून दोन ठार

Electricity collapses two killed | वीज कोसळून दोन ठार

वीज कोसळून दोन ठार


लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : वडगाव (ता. तासगाव) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतमजूर जागीच ठार झाले. शंकर कोंडी पाटील (वय ६०) आणि अरविंंद राजाराम बिसले (४५) अशी त्यांची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तासगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वडगाव येथे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी ओढ्यालगत झाडे तोडण्याचे काम सुरू होते. गावातील सहा शेतमजूर या कामावर होते. वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरु झाल्यानंतर चार मजूर झाडापासून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी बाजूला गेले, तर शंकर पाटील आणि अरविंद बिसले झाडापासून बाजूला जात असतानाच वीज कोसळली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच वडगावसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस पाटील अर्चना पाटील यांनी तासगाव पोलिसांना दिली. त्यानंतर रात्री उशिरा तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली.
घरची परिस्थिती हलाकीची
वीज कोसळून ठार झालेल्या दोघाही मजुरांच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. शंकर पाटील यांच्या पश्चात पत्नी असून त्यांना मुले नाहीत. अरविंद बिसले यांच्याही घरची परिस्थिती बेताची असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि शिक्षण घेणारी दोन मुले आहेत. या घटनेनंतर वडगावात हळहळ व्यक्त होत होती.
चौघेजण बचावले
झाडाचे तोडकाम सुरू असलेल्या ठिकाणी सहा शेतमजूर होते. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर यातील चौघे शेतमजूर तातडीने झाडापासून काही अंतरावर बाजूला गेले. इतक्यात झाडावर वीज कोसळली आणि झाडाखाली असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून इतर चार मजुरांचा प्राण बचावल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.

Web Title: Electricity collapses two killed