छोट्या पतसंस्थांच्या निवडणुका घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:22+5:302021-04-04T04:26:22+5:30
सांगली : मुदत संपलेल्या एक हजारपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सेवक, नागरी व ग्रामीण पतसंस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घ्याव्यात, ...

छोट्या पतसंस्थांच्या निवडणुका घ्याव्यात
सांगली : मुदत संपलेल्या एक हजारपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सेवक, नागरी व ग्रामीण पतसंस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी सांगली जिल्हा शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. अरविंद जैनापुरे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.
मंत्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात जैनापुरे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संसर्गामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना शासनाने ३१ मार्च २०२१ अखेर दिलेली मुदतवाढ संपली आहे. यापूर्वीही मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना शासनाने तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्रातील अनेक पतसंस्थांमध्ये संचालकांच्या मनमानी कारभारामुळे ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.
काही जागरूक ठेवीदारांनी अशा पतसंस्थांच्या संचालकांविरुद्ध ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने ठेवीदारांवर अन्याय झाला आहे. यापैकी अनेक ठेवीदार मृत झाल्याने त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
निवडणुका लांबणीवर गेल्याने मुदतवाढ मिळालेल्या संचालक मंडळाकडून सभासदांच्या हितास बाधा येईल, असे अनेक निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार करणे, नियमबाह्य नोकर भरती, कर्मचाऱ्यांना अनियमित वेतन वाढ दाखवून आर्थिक देवघेव करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक तडजोडी करून पुन्हा सेवेत घेणे आदी बाबींचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यामध्ये १०५२ नागरी ग्रामीण व सेवक पतसंस्था अशा छाेट्या पतसंस्थांमध्ये मोडतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांच्या निवडणुका घेऊन, दुसऱ्या टप्प्यात अन्य पतसंस्थांच्या घ्याव्यात, अशी मागणी केली आहे.