संस्थांच्या निवडणुकांचा डिसेंबरला धडाका

By Admin | Updated: October 29, 2014 00:08 IST2014-10-28T22:56:29+5:302014-10-29T00:08:15+5:30

खानापूर तालुका : बाजार समिती, विटा बँकेचीही निवडणूक; मतदारयाद्यांची माहिती संकलनाचे काम सुरू

Elections for the organization were held on December | संस्थांच्या निवडणुकांचा डिसेंबरला धडाका

संस्थांच्या निवडणुकांचा डिसेंबरला धडाका

दिलीप मोहिते- विटा -विधानसभा निवडणुकीचे वादळ शांत होत असतानाच आता खानापूर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. आॅक्टोबरपूर्वी मुदत संपलेल्या खानापूर तालुक्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया राज्यस्तरावर नव्याने स्थापन झालेल्या सहकार प्राधिकरणाने हाती घेतली असून, डिसेंबरअखेर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका संपविण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे. त्यासाठी मतदार याद्यांसह अन्य माहिती संकलित करण्याची मोहीम सहकार खात्याने राबविली आहे. त्यामुळे आता खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील स्थानिक राजकीय गट विधानसभेनंतर पुन्हा एकदा आमने-सामने येण्याचे संकेत आहेत.
खानापूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, खानापूर तालुका सहकारी सूतगिरणी, दि विटा मर्चंटस् को-आॅप. बॅँक व विटा अर्बन को-आॅप. बॅँक या प्रमुख चार मोठ्या संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. मात्र, या संस्थांसह अन्य सहकारी संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ देण्यात आली होती. दुष्काळ, टंचाई परिस्थिती यासह विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सहकार खात्याने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नोव्हेंबर व डिसेंबर महिनाअखेर राबविण्याची तयारी केली आहे.
विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व खानापूर तालुका सहकारी सूतगिरणी या दोन्ही संस्था आ. अनिल बाबर यांच्या ताब्यात आहेत, तर आ. बाबर यांचे समर्थक विनोद गुळवणी यांच्या ताब्यात दि विटा मर्चंटस् को-आॅप. बॅँक आहे. येथील विटा अर्बन को-आॅप. बॅँक माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्याकडे आहे. या चार महत्त्वाच्या सहकारी संस्था असल्या तरी, विटा अर्बन बॅँकेचा अपवाद वगळता अन्य संस्थांत मतदान प्रक्रिया राबविली जाण्याचे संकेत आहेत.
याशिवाय खानापूर तालुक्यातील २७ सहकारी सेवा सोसायट्या, १८ नागरी पतसंस्था, १२ औद्योगिक संस्था, एक ग्राहक संस्था, ५ सेवक पतसंस्था, एक प्रक्रिया संस्था, १० यंत्रमाग संस्था, २ पाणी पुरवठा संस्था, ६ मजूर सोसायट्या व २ सहकारी वाहतूक व स्वयंरोजगार संस्थांची मुदत संपल्यामुळे येत्या डिसेंबरअखेर या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकांवर आता राज्यस्तरीय सहकार प्राधिकरणाचे नियंत्रण राहणार असून, त्यांच्या सूचनेनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा हंगाम संपताच आता शहरीसह ग्रामीण भागातील राजकारणाचा केंद्रबिंंदू असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची तुतारी वाजली असल्याने, खानापूर तालुक्यातील वातावरण डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा निवडणूकमय होणार आहे.

Web Title: Elections for the organization were held on December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.