जिल्ह्यात लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:11+5:302021-09-03T04:27:11+5:30
सांगली : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगितीचा कालावधी ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे. नवा आदेश नसल्याने निवडणूक प्राधिकरणाने ...

जिल्ह्यात लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे धुमशान
सांगली : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगितीचा कालावधी ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे. नवा आदेश नसल्याने निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दीड हजारांवर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे धुमशान लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जानेवारी २०२१ मध्ये सहकारी संस्थांच्या निवडणूक घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात सहा टप्प्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन केले होते. त्याची बहुतांश तयारी पूर्ण झाल्यानंतर मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे निवडणुकांची प्रक्रिया आहे त्या स्थितीत थांबविण्यात आली. ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती होती. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर शासनाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. याशिवाय जिल्हा बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू असल्याने जिल्ह्यातील अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकाही घेण्याबाबत तयारी करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात १ हजार ५२८ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्था निवडणुकीस पात्र असल्याने टप्प्या-टप्प्याने त्या घेण्याबाबत नियोजन करण्यात येऊ शकते.
जानेवारीमध्ये केलेल्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात कोरोनामुळे स्थगित झालेल्या १७३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा समावेश होता. आता जिल्हा बँकेची स्वतंत्र प्रक्रिया सुरू आहे. १७३ पैकी ७३ संस्थांची अंतिम मतदार यादी निश्चित झाली आहे. जिल्हा बँकेची प्राथमिक मतदारयादी सादर झाली आहे. येत्या आठवड्यात मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर होईल. दीड हजारांवर संस्थांच्या निवडणुकांसाठी मागील नियोजन तयार असल्याने फारशी अडचण येणार नाही.
निवडणूक प्राधिकरण किंवा शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत; मात्र प्राधिकरणामार्फत निवडणुकांबाबतची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे येथील सहकार विभागानेही त्यासाठी पूर्वतयारी केली आहे.
कोट
निवडणुकांवरील स्थगितीची मुदत संपली आहे. निवडणुकांसाठी यापूर्वी आम्ही नियोजन केले होते. आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे निवडणुकांची प्रक्रिया राबविण्यात येईल.
- नीळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सांगली