दिग्गजांमुळे संखची निवडणूक लक्षवेधी
By Admin | Updated: December 26, 2016 22:59 IST2016-12-26T22:59:50+5:302016-12-26T22:59:50+5:30
सर्वसाधारण महिलेसाठी खुला : नेत्यांच्या इच्छेवर पाणी; इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी
दिग्गजांमुळे संखची निवडणूक लक्षवेधी
गजानन पाटील - संख जत तालुक्यातील संख गटात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ असल्याने लढत लक्षवेधी ठरणार आहे. जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाला आहे. त्यामुळे इच्छुक नेत्यांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. भाजप, कॉँग्रेसने मुलाखती घेतल्या आहेत. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लढती दुरंगी होणार की तिरंगी, याकडे लक्ष लागले आहे.
मतदार संघाची प्रथमच पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्याने गिरगाव पंचायत समिती गणाची निर्मिती झाली आहे. पूर्वीच्या तिकोंडी गणाचा दरीबडची गटात समावेश केला आहे. उमदी, जाडरबोबलाद, दरीबडची या तीन गटांतील आठ गावांचा संखमध्ये समावेश करण्यात आला आहे. संख हा पूर्व भागातील संवेदनशील गट आहे. लोकसंख्या ३१ हजार २६४ आहे. १३ गावांचा समावेश आहे.
भाजपचे आमदार विलासराव जगताप, जनसुराज्यचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, काँग्रेसचे नेते, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत या नेत्यांचा मतदारसंघ आहे. आ. विलासराव जगताप (१९९१) व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे (२००२), महिला बालकल्याण माजी सभापती सुजाता पाटील (२००७), माजी जि. प. उपाध्यक्ष बसवराज पाटील (२०१२) यांनी या गटाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
गेल्यावेळी राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षाचे बसवराज पाटील, कॉँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यात चुरशीने लढत झाली होती. त्यात बसवराज पाटील २ हजार १७ मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र आ. जगताप, बसवराज पाटील हे दोन नेते एका बाजूला असतानासुद्धा तिकोंडी पं. स. गणातून कॉँग्रेसच्या वैजयंती व्हनमाने विजयी झाल्या होत्या. संख पं. स. गणातून राष्ट्रवादीचे आर. के. पाटील विजयी झाले होते.
बसवराज पाटील यांना अडीच वर्षे उपाध्यक्षपद मिळाले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आ. जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पाटील यांनी जिल्हा बँक व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका कॉँग्रेससोबत लढवल्या. त्यामध्ये बाजार समितीत त्यांच्या गटाचे दयगोंडा बिरादार यांना संधी मिळाली. विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे आ. मोहनराव कदम यांना मदत केली आहे. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत जनसुराज्यच्या सदस्यांनी काँग्रेसच्या पतंगराव कदम गटाविरोधात विशाल पाटील गटाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे नेते कॉँग्रेससोबत असतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
जिल्हा परिषदेसाठी कॉँग्रेसकडून संखचे माजी उपसरपंच श्रीदेवी वज्रशेट्टी, सविता कोट्याळ, भाजपकडून जयश्री पाटील, प्रतिमा बिरादार इच्छुक आहेत. पंचायत समिती गणातून कॉँग्रेसकडून माजी पं. स. सदस्य साहेबराव टोणे यांची स्नुषा निकिता टोणे, आक्काताई टोणे (आसंगी), भाजपकडून काशीबाई टोणे, यशवंत हिप्परकर यांची पत्नी इच्छुक आहेत. गिरगाव गणातून कॉँग्रेसकडून राम दुधाळ (भिवर्गी), राजू पाटील (गिरगाव), श्रीशैल बगली, तर भाजपकडून भिवर्गीचे उपसरपंच आमसिद्ध बिरादार, माणिकनाळचे उपसरपंच अॅड. आ. सी. घेरडे, गोपाळ कुंभार (गिरगाव), मलकारी पवार इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेसाठी पांडोझरीच्या आदर्श सरपंच सलिमा मुल्ला अपक्ष म्हणून लढणार आहेत.
जनसुराज्यकडून माजी सभापती सुजाता पाटील, सरपंच सुजाता शिळीन, बसवराज पाटील यांची कन्या यापैकी एकीची उमेदवारी असेल.
जनसुराज्य-भाजप युती
जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांची राज्यात भाजपबरोबर युती आहे. तोच फॉर्म्युला तालुक्यात राहणार आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती होणार, अशी शक्यता आहे. याबाबत बसवराज पाटील काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या भूमिकेवरच गटाचा निकाल अवलंबून राहणार आहे.
मतदार संघातील संख हे मोठ्या मतदार संख्येचे गाव आहे. उमेदवारी देताना संख गावातीलच उमेदवारी असणार आहे.
राष्ट्रवादी निवडणूक स्वतंत्रपणे लढणार, की आघाडी करून लढणार, याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मुचंडी, संख, उमदीत बैठक घेऊन मते जाणून घेतली आहेत.
जनसुराज्य-भाजप यांची आघाडी झाल्यास समीकरणे बदलू शकतात. आघाडी होईल अशी चिन्हे आहेत. नाही झाली तर भाजप, कॉँग्रेस, जनसुराज्यला समान संधी असू शकेल, अशी स्थिती आहे.
असा आहे मतदारसंघ...
संख जिल्हा परिषद गट -
एकूण गावे - १३, संख पंचायत समिती गण - इतर मागास महिला प्रवर्ग- गोंधळेवाडी, संख, आसंगी (जत), तिल्याळ, लमाणतांडा (द.ब)
गिरगाव पंचायत समिती गट -
इतर मागास प्रवर्ग - बोर्गी बुद्रुक, आक्कळवाडी, लवंगी, माणिकनाळ, मोरबगी, गिरगाव, भिवर्गी, जालिहाळ बुद्रुक