स्थायी सभापती निवड ९ सप्टेंबरला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:36+5:302021-09-03T04:27:36+5:30
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम गुरुवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केला. गुरुवार, दि. ९ सप्टेंबरला निवडणूक होणार ...

स्थायी सभापती निवड ९ सप्टेंबरला होणार
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम गुरुवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केला. गुरुवार, दि. ९ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. सभापती निवड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाचा तसेच दोन वर्षे पूर्ण झालेल्या आठ सदस्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे. रिक्त झालेल्या स्थायी सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर नवीन सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन दिवसांपूर्वी पांडुरंग कोरे यांचा सभापतिपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. तत्पूर्वी गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या आठ नवीन सदस्यांची निवड महासभेत करण्यात आली होती. या नवीन सदस्यांचा कार्यकाळ नऊ सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे.
महापालिकेत सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची असली, तरी स्थायी समितीवर अजूनही भाजपचे वर्चस्व आहे. १६ सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये भाजपचे नऊ, तर काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. नव्याने निवड झालेल्या आठ सदस्यांमध्ये भाजपचे निरंजन आवटी, गजानन आलदर, जगन्नाथ ठोकळे आणि कल्पना कोळेकर यांचा समावेश आहे, तर काँग्रेसकडून फिरोज पठाण आणि संतोष पाटील यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संगीता हारगे आणि नर्गिस सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी एक वर्षात स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी पुढील एक वर्षासाठी मनगू सरगर यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून स्थायी समितीवर त्यांचे वर्चस्व आहे. सहा महिन्यांपूर्वी महापौर, उपमहापौर निवडणुकीत सत्तांतर झाले. तरीही स्थायी समिती भाजपच्या ताब्यात असल्याने या महत्त्वाच्या समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. भाजपकडून सभापतिपदासाठी निरंजन आवटी, जगन्नाथ ठोकळे, सविता मदने यांची नावे चर्चेत आहेत.