सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:28+5:302021-01-18T04:24:28+5:30
सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा शासनाकडून सध्या खेळखंडोबा सुरू असून, याबाबत सहकार क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे. सांगली ...

सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा
सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा शासनाकडून सध्या खेळखंडोबा सुरू असून, याबाबत सहकार क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे. सांगली जिल्हा बँकेसह १७३ संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमास पुन्हा खो बसला आहे. उर्वरित काळात दीड हजारावर संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडताना सहकार विभागाची कसरत होणार आहे.
मुदत
संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश चारच दिवसांपूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह १७३ संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, शनिवारी पुन्हा शासनाने कोरोनाचे कारण देत राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक ३१ मार्च २०२१ पर्यंत लांबणीवर टाकली आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात सहकारी क्षेत्रात मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी २५ जानेवारीपर्यंत ठराव मागण्याचे आदेश निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांनी दिले होते. १८ जानेवारी रोजी अन्य सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार होता.
दरम्यान, १६ जानेवारीला राज्य शासनाने पुन्हा या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. याबाबतचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले.
यामुळे सहकार क्षेत्रात नाराजी पसरली आहे. जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. त्यावर आता मुदतवाढीमुळे पाणी पडणार आहे.