सांगली : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमधून बोलतोय असे भासवून सांगलीतील वृद्धास ऑनलाइन बनावट ‘लिंक’ पाठवून त्यांच्या खात्यातील ४ लाख ४८ हजार ४९२ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत अनिलकुमार बाबुराव वाले (वय ७०, रा. राहुल गोल्ड अपार्टमेंट, डॉ. पी. आर. पाटील मार्ग, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिलकुमार वाले हे म्युच्युअल फंड एजंट आहेत. दि. २३ रोजी ते घरी असताना त्यांना भामट्याने फोन करून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पुणे येथून बोलत असल्याचे सांगितले. वाले यांच्या गॅस कनेक्शनचे ३१० रुपये पेमेंट उशिरा आले आहे. त्याचा १५ रुपये दंड ऑनलाइन लगेच भरा, तुम्ही पैसे नाही भरले तर गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल अशी भीती घातली. कनेक्शन बंद व्हायचे नसेल तर व्हॉटस् ॲपवर पाठवलेली ‘लिंक’ ओपन करून त्यावर पैसे भरण्यास सांगितले.वाले यांचा भामट्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी व्हॉटस्ॲपवर आलेली ‘लिंक’ उघडून ॲक्सिस बँकेतील खात्यावरून नेट बँकिंगद्वारे १५ रुपये पाठवले. त्यानंतर भामट्याने वाले यांनी पेमेंट पाठवलेल्या बचत खात्यावरून तसेच पत्नी कल्पना वाले आणि त्यांच्या नावाने असलेल्या जॉइंट खात्यावरून ४ लाख ४८ हजार ४९२ रुपये हस्तांतर करून घेतले.
वाले यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यानंतर सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी भामट्याविरूद्ध फिर्याद दिली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ सी, डी नुसार अज्ञातावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.