एकांकिका, शॉर्ट फिल्म्स्, एक्स्प्रेसला दाद
By Admin | Updated: September 30, 2015 00:05 IST2015-09-29T22:52:09+5:302015-09-30T00:05:54+5:30
सांगलीत कार्यक्रम : सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एकांकिका, शॉर्ट फिल्म्स्, एक्स्प्रेसला दाद
सांगली : ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका, शॉर्ट फिल्मस् व डान्स एक्स्प्रेसला सखी सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘लोकमत’च्या सखी मंचतर्फे प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम राबविले जातात. गणेशोत्सवानिमित्त सांगलीतील सखी सदस्यांनी महिला गणेश मंडळ स्थापन केले होते. यानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात सुमित डान्स अॅकॅडमी व भगवती क्रिएशन प्रस्तुत व निर्मित एकांकिका, शार्ट फिल्म्स् आणि डान्स एक्स्प्रेस अशा चार विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यशोधन गडकरी लिखित-दिग्दर्शित ‘देह आंधळी कोशिंबीर’ या एकांकिकेमध्ये मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. देह हा कोणत्याही धर्माचा, जातीचा नाही, तर ती एक प्रकृतीची निर्मिती आहे. त्याला धर्मात अडकवून न ठेवता स्वतंत्रपणे जगू दिले पाहिजे, असा संदेश या एकांकिकेमधून देण्यात आला.
‘बॅक टू स्कूल’ या फिल्मी कॉमेडी व डान्सिकल एकांकिकेमध्ये शाळेतील प्रेमकहाणी, त्यात होणारी गंमत-जंमत, मज्जा-मस्तीने सखींना खळखळून हसायला लावले. ‘शॉर्ट फिल्मस्’मधून समाजप्रबोधनाचे दहा वेगवेगळे संदेश देण्यात आले. ‘डान्स एक्स्प्रेस’मध्ये हिंदी-मराठी चित्रपटांतील गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. या चार वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सखींचे मनोरंजन करत सामाजिक संदेश देण्यात आला. समित साळुंखे, यशोधन गडकरी, शशी तुपे, राजेश कोलन, ऋषिकेश तुराई, अमरनाथ खराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादरीकरण केले. (प्रतिनिधी)