तडवळे लांडग्यांच्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:15+5:302021-09-06T04:30:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : तडवळे (ता. आटपाडी) येथे परजिल्ह्यातील मेंढपाळाच्या कळपावर लांडग्याने रविवारी पहाटे हल्ला करत आठ ...

तडवळे लांडग्यांच्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : तडवळे (ता. आटपाडी) येथे परजिल्ह्यातील मेंढपाळाच्या कळपावर लांडग्याने रविवारी पहाटे हल्ला करत आठ मेंढ्या ठार केल्या, तर पाच मेंढ्या बेपत्ता आहेत. या मेंढपाळांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ व बेळगाव, निपाणी येथील शेतकरी मल्लाप्पा पडवळे, नवनाथ मुरारी कोळेकर, शंकर बंडगर, संदीप खांडेकर या सर्व मेंढपाळांचा तळ तडवळेतील शेतकरी दत्तात्रय नामदेव शेंडे यांच्या करगणी येथील गोसावी वस्तीजवळील हुंबरवाडा मळ्यातील शेतात होता.
रविवार, दि. ५ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला झाला. मेंढराच्या संरक्षणासाठी लावलेली वागर लांडग्यांनी तोडून कळपात प्रवेश केला आणि पाच मोठी मेंढरे व तीन लहान पिलांना ठार केले. या हल्ल्यात अन्य पाच मेंढरे बेपत्ता आहेत. मेंढरांच्या ओरडण्याच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले असता कळपात लांडग्यांनी धुडगूस घातल्याचे निदर्शनास आले. मेंढपाळांची चाहूल लागताच बकऱ्यांना तोंडात धरून घेऊन लांडगे पसार झाले.
हल्ल्याची घटना मेंढपाळांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना व यशवंत क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर, शेंडूर शाखाध्यक्ष राजाराम हजारे यांना दिली. संजय वाघमोडे यांनी वनरक्षक अंबिका तळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश चव्हाण यांना रीतसर पंचनामा करण्याची विनंती केली.
वनपाल पांडुरंग बालंडे, वनरक्षक अंबिका तळे, वनरक्षक आटपाडी सुखदेव माळी, वनमजूर जितेंद्र गिड्डे, पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गाढवे, पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी करगणी यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी रासपाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर, राम कोळेकर उपस्थित होते.