जत तालुक्यातील २६ पैकी आठ तलाव कोरडे...
By Admin | Updated: November 16, 2016 23:20 IST2016-11-16T23:20:53+5:302016-11-16T23:20:53+5:30
अत्यल्प पाऊस : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; तीन तलावांची पाणी पातळी मृतसंचयाखाली गेल्याने चिंता

जत तालुक्यातील २६ पैकी आठ तलाव कोरडे...
गजानन पाटील -- संख -कमी झालेला पाऊस, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष व पाण्याचा अवाजवी उपसा यामुळे जत तालुक्यात ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची पातळी कमी झाल्याने २६ तलावांपैकी ८ तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. २ मध्यम प्रकल्पांपैकी संख मध्यम प्रकल्प कोरडा पडला आहे, तर उटगी येथील दोड्डनाला मध्यम प्रकल्पात ६ टक्केच पाणीसाठा शिल्क आहे. तीन तलावांची पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे. म्हैसाळ योजनेतील पाणी तलावात सोडल्याने पश्चिम भागातील ८ तलावांत पाणीसाठा बऱ्यापैकी आहे. पण पावसाच्या स्रोतावर अवलंबून असलेल्या तलावातील पाणीसाठा डिसेंबरच्या मध्यापर्यंत संपुष्टात येणार आहे.
पाण्याचा उद्भव साठा संपत आल्याने पुढील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत दिवस कसे काढायचे? हा प्रश्न आ वासून उभा आहे. सध्याच तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या सहा वर्षापासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटापर्यंत खाली गेली आहे. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंबबागा काढून टाकाव्या लागल्या आहेत. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी मान्सून पावसाने जुलै महिन्यात थोड्या प्रमाणात हजेरी लावली होती. परतीच्या पावसानेही दडी दिली.
परिसरात फक्त ५४ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे सिद्धनाथ, दरीबडची, तिकोंडी, मिरवाड, भिवर्गी, डफळापूर, बेळुंखी व संख मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तसेच पश्चिम भागातील प्रतापूर, कोसारी, तिप्पेहळ्ळी, बिरनाळ, वाळेखिंडी, सनमडी, येळवी, शेगाव या तलावांत पाणीसाठा चांगला आहे, पण जालिहाळ बुद्रुक, पांडोझरी, अंकलगी या तलावांतील पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे.
जुलै-आॅगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसाने सिद्धनाथ, जालिहाळ बुद्रुक, अंकलगी व दोड्डनाला प्रकल्पातील पाणीसाठ्याचा अवाजवी उपसा केला आहे.
पिण्यासाठी पाणी अरक्षित ठेवण्याची आवश्यकता होती. पण पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने पाणी उपसा केला आहे. उपसा रोखण्यासाठी जत व संख पाटबंधारे विभागात कर्मचारी संख्या कमी आहे. अनेक वर्षापासून जागा रिक्त आहेत. दोड्डनाला मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी मृतसंचयाखाली आहे. डफळापूर, दरीबडची, लमाणतांडा येथेही पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
दरीबडची साठवण तलाव कोरडा
दरीबडची परिसरामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे साठवण तलाव सहा वर्षापासून पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलाव बांधल्यापासून २००९ मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर तलाव भरलाच नाही.