सांगलीत आठ बसेस फोडल्या निषेध
By Admin | Updated: June 2, 2014 01:18 IST2014-06-02T01:09:49+5:302014-06-02T01:18:05+5:30
मोर्चा, रॅली : जिल्ह्यात ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगलीत आठ बसेस फोडल्या निषेध
सांगली : सोशल मीडियातून राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचे तीव्र पडसाद आज, रविवारी सांगली शहरासह जिल्ह्यात उमटले. शिवसेना, भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी ठिकठिकाणी मोटारसायकल रॅली, निषेध मोर्चे काढले. जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला. सांगली, मिरज, बुधगाव, इस्लामपुरात सात ते आठ एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केली, तर दोन ट्रकनाही लक्ष्य करण्यात आले. एसटी महामंडळाने सर्व मार्गांवरील वाहतूक बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या घटनेने शहरासह ग्रामीण भागांतही तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळनंतर जिल्ह्यातील तणाव निवळला. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केल्याचे पडसाद काल, शनिवारी रात्रीपासून सांगलीत उमटले. सांगली, मिरज, सांगलीवाडी, इस्लामपूर व बुधगाव येथे अज्ञातांनी पाच एसटी बसेसवर दगडफेक केली. या घटनेनंतर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. जमखंडी-पुणे एसटीवर सांगलीवाडीत दगडफेक झाली. सांगली-दापोली (एमएच १० एन. ९५९६) बसवर मुख्य बसस्थानकाजवळ दगडफेक झाली. चालकाने एसटी तिथे थांबविली नाही. यामुळे अज्ञातांनी बसचा पाठलाग केला. सांगली-फलटण (एमएच १४ बीटी. १२६६) एसटीवर बुधगाव (ता. मिरज) येथील नाक्यावर अज्ञातांनी दगडफेक केली. चालकाने बुधगाव पोलीस चौकीसमोर बस थांबविली. अज्ञातांनी तिथे येऊन पुन्हा दगडफेक करून पलायन केले. दगडफेकीच्या घटनेनंतर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. यामध्ये पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. मिरजेतही शिवसेना, भाजप, शिवप्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत चौकात या प्रकाराचा निषेध केला. दुपारी म्हैसाळ उड्डाण पुलावर (एमएच ४० बी ८९३१) या जमखंडी-मिरज एसटीवर अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या. लिंगनूर येथे (एमएच ४० वाय ५६६७) या मिरज-खटाव एसटीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. मालगावात (एमएच १४-०७७) या एसटीवर अज्ञातांनी दगडफेक करून काचा फोडल्या. मिरजेत किल्ला परिसरात व शिवाजी रस्त्यावर एका हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रकवर अज्ञात तरुणांनी दगडफेक करून पलायन केले. इस्लामपूर येथेही एका बसवर दगडफेक झाली. सांगलीसह इस्लामपूर, वीटा, कवठेमहांकाळ, कडेगाव, तासगाव, जतमध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढून दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. सायंकाळनंतर जिल्ह्यातील तणाव निवळला होता. (प्रतिनिधी)