सांगली : सांगली जिल्ह्याचा वार्षिक जीडीपी (जिल्हा सकल देशांतर्गत उत्पादन) सध्या ६७ हजार कोटी असून तो एक लाख ७७ हजार कोटी रूपयांवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतीमाल व प्रक्रिया उद्योग वाढवून निर्यातीच्या माध्यमातून परकीय चलन आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जपान, जर्मनीप्रमाणे आपल्या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याचे तंत्र अवलंबून सांगली जिल्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.कृषी परिषद निर्यात सक्षमीकरण – फळबागेतून समृद्धीकडेच्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी काकडे बोलत होते. या कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, कृषी उपसंचालक धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी कडेगाव रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी विटा विक्रम बांदल, भारतीय डाळिंब संघ पुणे अध्यक्ष प्रभाकर चांदणे आदी उपस्थित होते.काकडे म्हणाले, जिल्ह्यामध्ये अनेक सकारात्मक बाबी होत असून, जिल्ह्याची वाटचाल जिरायतीकडून बागायतीकडे सुरू आहे. आटपाडी, खानापूर, जत तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हाेते. आज त्या भागामध्ये उपसा सिंचन योजनेमुळे शाश्वत पाणीपुरवठ्याचे साधन उपलब्ध झाले आहे. जेव्हा शेतीसाठी पाणीच नव्हते, त्यावेळी जिरायत पिकाशिवाय पर्याय नव्हता. परंतु आता शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी उद्योगाचे मार्ग दाखविण्याची गरज आहे.या कार्यशाळेत संचालक मंडळ अपेडाचे सदस्य परशुराम पाटील, प्रकल्प संचालक विनायक कोकरे, कोल्हापूर विभाग कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, पणनचे सरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, सहायक व्यवस्थापक अपेडा पांडुरंग बामणे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ आदींनी कृषी मालाच्या निर्यात वाढीसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन केले. द्राक्ष बागायतदार संघटनेचे दत्ताजीराव पाटील, डाळिंब उत्पादक संघटनेचे अभिजित चांदणे, केळी उत्पादक संघटनेचे दत्तात्रय मोहिते, आंबा उत्पादक संघटनेचे सचिन नलवडे, पेरू उत्पादक संघटनेचे शिवाजी खिलारे, डॉ. कल्याण बाबर, हेमंत नवरे, अमोल माने, महेश माने, व्यंकटेश इरळे, सौम्यजित विश्वास, किरण डोके, अशोक बाफना आदींनी कृषी मालाचे ब्रँडिंग, प्रक्रिया, पॅकेजिंग व मार्केटिंग, निर्यात वाढीस चालना मिळण्याच्या दृष्टीने विविध प्रश्न मांडले. फळपिकातून उत्पन्न वाढीस संधीतालुका कृषी अधिकारी प्रत्येक शेतकऱ्याशी जोडला गेला असून त्याप्रमाणे मार्केटिंगच्या दृष्टीने पणन विभागाचे कामकाज शेतकऱ्यांशी निगडित व्हावे. पणन विभाग प्रत्येक शेतकऱ्याशी जोडला जावा. कृषी आणि पणन एकत्र आल्यास काढणीपश्चात तंत्रज्ञानाद्वारे आणि फळपिक प्रक्रियेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. द्राक्ष, आंबा, केळी, पेरू, डाळिंब आदी फळपीक उत्पादकांच्या अडचणींचे निराकरण या कार्यशाळेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी काकडे यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्ह्याच्या जीडीपीचे १.७७ लाख कोटींचे उद्दिष्ट - अशोक काकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:33 IST