वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:44+5:302021-09-26T04:28:44+5:30
फोटो ओळ : कडेगाव येथे सागरेश्वर सहकारी सूतगीरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मार्गदर्शन केले. ...

वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील
फोटो ओळ : कडेगाव येथे सागरेश्वर सहकारी सूतगीरणीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शांताराम कदम यांच्यासह संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
कडेगाव : वस्त्रोद्योग व्यवसाय जागतिक मंदीमुळे तसेच कोरोनाच्या महामारीने आर्थिक मंदीचा सामना करीत आहे. वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील आहोत. वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्याशी सूतगिरण्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली आहे. लवकरच सकारात्मक निर्णय होतील, अशी माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
कडेगाव येथील सागरेश्वर सहकारी सूतगिरणीची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली. या वेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम बोलत होते. सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, उपाध्यक्ष महेश कदम, कार्यकारी संचालक ए. बी. चालुक्य आदी उपस्थित होते.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, सूतगिरण्यांना प्रतियुनिट ३ रुपये वीज दरात सवलत तसेच प्रतिचाती ३ हजार रुपये कर्ज वित्तीय संस्थांकडून करण्याबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक विचार करीत आहे. या दोन्ही सवलती मिळाल्यास राज्यातील सूतगिरण्या आर्थिक संकटातून बाहेर पडतील.
कार्यकारी संचालक ए. बी. चालुक्य यांनी अहवाल वाचन केले. फायनान्स मॅनेजर ई. डी. पवार यांनी नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. सिराज पटेल यांनी सूत्रसंचालन केले. संचालक उदय थोरात यांनी आभार मानले. ॲड. ए. बी. मदने यांच्यासह सर्व संचालक सभासद, सूतगिरणीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
चाैकट
सभासदांना चादरी वाटप
सागरेश्वर सहकारी सूतगिरणी राज्यात अग्रेसर आहे. अडचणींचा सामना करूनही सूतगिरणी नफ्यात आहे. यामुळे या सूतगिरणीने लाभांश स्वरूपात सभासदांना चादर देण्याचा निर्णय घेतला. प्रातिनिधिक स्वरूपात पाच सभासदांना डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते चादर वाटप करण्यात आली.