म्हणूनच त्यांच्याकडील नेतृत्वगुण व युवकांना संघटित करण्याची पध्दत, वक्तृत्वावरील पकड, काम करण्याची तळमळ ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील व जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या खांद्यावर सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र आता शिराळा विधानसभा मतदार संघापुरते मर्यादित राहिले नसून, सांगली जिल्हा असे विस्तारले आहे.
पक्षनेतृत्वाने दिलेली जबाबदारी ते सक्षमपणे पेलतील, यात शंकाच नाही. म्हणूनच ते जिल्हाभर फिरून युवक, महिला व थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षातील सर्व नेतृत्वांनी केलेली कामे आणि पक्षाची ध्येय-धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत.
वडील, आमदार मानसिंगभाऊ व पूर्वजांचा समाजकारणाचा वसा आणि वारसा अखंडपणे सुरू ठेवून बदलत्या काळानुरूप वाटचाल करतील. सर्व क्षेत्रात नव-नवीन आव्हाने येताहेत. राजकीय संघर्षाला कधीच विश्रांती नसते. जीवनात संघर्षाशिवाय रंगतही नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करत असताना काळ्या व लाल मातीत जन्मलेल्या तमाम नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, सार्वजनिक समस्या त्यांच्या हातून सुटाव्यात. शिराळा तालुक्याची किंबहुना सांगली जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठीच्या योगदानात या नव्या नेतृत्वाला यश मिळावे, सर्वांचेच जीवन सुखमय व्हावे, हीच या वाढदिनी हार्दिक शुभेच्छा..!
- संतोषकुमार भालेकर (प्रसिद्धी अधिकारी, विश्वास सहकारी साखर कारखाना)