कुशल संघटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:26+5:302021-01-13T05:10:26+5:30
थोरल्या साहेबांचं छत्र डोक्यावरून हरपल्यानंतर, आधारवड गेल्यानंतर मनाचं खच्चीकरण होणं स्वाभाविक होतं, पण आमदार मोहनराव कदम दादांसह अवघ्या मतदारसंघाची ...

कुशल संघटक
थोरल्या साहेबांचं छत्र डोक्यावरून हरपल्यानंतर, आधारवड गेल्यानंतर मनाचं खच्चीकरण होणं स्वाभाविक होतं, पण
आमदार मोहनराव कदम दादांसह अवघ्या मतदारसंघाची आग्रही इच्छा होती की, गोरगरीब जनतेची,मतदारसंघाची जबाबदारी विश्वजित कदम उर्फ बाळासाहेबांनी घ्यावी. पुढे फक्त पलूस-कडेगांवचं पालकत्व स्वीकारणं एवढीच जबाबदारी नव्हती. त्यात थोरल्या साहेबांची अस्मिता जपणं ही पहिली नैतिक जबाबदारी होती कारण आयुष्यभर अजातशत्रू, निष्कलंक,राजकारणातला स्वच्छ प्रतिमेचा नेता ही थोरल्या साहेबांची मिळकत पुढे बाळासाहेबांना जपायची होती. मात्र विश्वजित कदम यांनी त्यांच्या अंगी असलेल्या संघटन कौशल्याच्या जोरावर सर्व जबाबदाऱ्या धीरोदात्तपणे सांभाळल्या .
साहेब गेल्याच्या दुःखात असतानाच आमदारकीची पोटनिवडणूक लागली. जनतेच्या आशीर्वादाने आणि साहेबांच्या पुण्याईने ती निवडणूक बिनविरोध झाली. पण भारत जिंकलेल्या भाजपाच्या सत्तेत काँग्रेसी नेत्यानं बिनविरोध व्हावं ही गोष्ट संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी होती. बाळासाहेबांनीही त्याचं श्रेय सर्वपक्षीय नेत्यांना आणि जनतेला दिलं. आमदारकीचे काही दिवस अधिवेशनात गेले आणि निसर्गरूपी ‘शत्रूने खिंडीत गाठलं’. सांगली, कोल्हापूरला महापुराने विळखा घातला. माझं पलूस-कडेगांव म्हणून बाळासाहेबांनी मतदारसंघाकडे तातडीने धाव घेतली आणि पलूस तालुक्यात मुक्काम ठोकला. तशी नवख्या आमदारकीला जबाबदारी नेटाची होती.इतिहासात भल्या-भल्यांना पळ काढायला लावणारं ‘महापुराचं संकट’ बाळासाहेबांसाठी ‘थोरल्या साहेबांच्या अस्मितेची’ परीक्षा होती. साहेबांनी हाताच्या फोडाप्रमाणे मतदारसंघ जपला होता. बाळासाहेबांनी जिगर बांधली. स्वतः मनगट बळकट करून पाण्यात उतरले. झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जाग येणार नव्हती मग काय बाळासाहेब कदम नावाच्या ‘सरकार’ ने सूत्रं हलवली. थोरल्या साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘एका दणक्यात यंत्रणा लागली’. एका रात्रीत जनसेवक नेमले गेले. पंधरा हजार लोकांची राहण्याची व्यवस्था,नाष्टा-जेवण, जनावरांना चारा मिळाल्याशिवाय घरी जायचं नाही असा बाळासाहेबांचा धमकीवजा आदेश सहकाऱ्यांना सर्वमान्य होता. नेते-कार्यकर्ते आपला नेता पाण्यात उतरून काम करतोय हे पाहून प्रत्येकजण झटत होता. बाळासाहेबांनी देशभरात मदतीची हाक दिली.उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘शेवटचा माणूस बाहेर काढेपर्यंत मी इथून जाणार नाही’ हा बाळासाहेबांचा निर्भीडपणा अवघा महाराष्ट्र पाहत होता. या नियोजनबद्ध यंत्रणेचं देशभरात कौतुक होत होतं. तेवढ्यात काळाचा घाला ब्रम्हनाळ गावावर ओढला गेला. बोट पलटून अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला. पण नावाड्यासहित, जखमी आणि मृत्युमुखी प्रत्येकाला आर्थिक मदत केली आणि मिळवून दिली . महापूर ओसरल्यानंतर भारती विद्यापीठ, हॉस्पिटल, सोनहिरा,उदगिरीच्या हातभारानं गावंच्या गावं चकचकीत केली गेली. महाराष्ट्रात बाळासाहेबांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून केलेल्या बांधणीमुळे राज्यभरातून युवकांचा हातभार लागला.वीज,पाणी,आरोग्य या व्यवस्था मार्गी लागल्या.त्यात पायाचं नख गेलेलं. बाळासाहेबांना कल्पना नव्हती.पायाला पिशवी बांधून पावले चिखलाचे रस्ते तुडवित होती. पण बाळासाहेब तयारीला लागले होते ते महापुराचा आढावा घेऊन शासकीय मदतीच्या. आढावा तयार होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट झाली. बऱ्याच मागण्या मान्य झाल्या.महापुराच्या संकटाला बाळासाहेब पुरून उरले.
तेवढ्यात पक्षाने जनतेसाठी केलेलं काम बघून राज्य काँग्रेसच्या ‘कार्याध्यक्ष’ पदाची जबाबदारी दिली. भाजपाने बाळासाहेबांना आपल्याकडे ओढण्याचे अनेक मार्गांनी प्रयत्न केले. या आधीही तसे प्रयत्न भाजपाकडून झाले होते. पण ‘रक्तात काँग्रेस आहे’ असं भक्कमपणे सांगून बाळासाहेब ‘थोरल्या साहेबांची निष्ठा’ जपत स्वाभिमानाने निवडणुकीसाठी सज्ज होते.
निवडणूक लागली, मतदान झाले. राज्यात काँग्रेसमध्ये एक नंबरला बाळासाहेब निवडून आले. काँग्रेस सत्तेत सहभागी झालं.कोणत्याही लॉबिंगशिवाय फक्त कामाच्या जोरावर बाळासाहेबांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. बऱ्याच राजकीय नेत्यांना जी संकटं संपूर्ण कारकीर्दीत बघायला भेटली नाहीत. अशा बलाढ्य मोठ्या संकटांचा सामना युवा मनाच्या दिलदार नेत्याने म्हणजे आमच्या बाळासाहेबांनी मोठ्या धैर्याने आणि जिद्दीने केला.
सगळ्या संकटांना स्वतःच्या छातीवर घेत,‘संकटांनी भरलेली खिंड जिंकली’. मतदारसंघाला थोरल्या साहेबांची उणीव भासू दिली नाही.मतदारसंघ बाळासाहेबांनी हातावरच्या फोडाप्रमाणे जपला आणि आजही जपत आहेत.
थोरांप्रती प्रचंड आदर आणि गोरगरिबांचा कळवळा असणाऱ्या अशा बहुगुणी योद्ध्याला जन्मदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ...