शैक्षणिक प्रगती हेच मुस्लिमांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर

By Admin | Updated: September 8, 2015 22:37 IST2015-09-08T22:37:51+5:302015-09-08T22:37:51+5:30

हुमायून मुरसल यांचे मत --थेट संवाद

Educational progress is the answer to all the questions of the Muslims | शैक्षणिक प्रगती हेच मुस्लिमांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर

शैक्षणिक प्रगती हेच मुस्लिमांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर

मुस्लिमांचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी महात्मा गांधी मुस्लिम विद्यापीठाच्या निर्मितीची मागणी करून त्यासाठी समाजात जागृती करणाऱ्या ‘हिंदी है हम हिंदोस्ता हमारा’ या संस्थेचे प्रमुख प्रा. हुमायून मुरसल यांच्याशी केलेली बातचित.

प्रश्न : मुस्लिमांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी कशासाठी?
उत्तर : मुस्लिम सर्व क्षेत्रात मागास आहेत. त्यांचे मागासलेपण वाढतच चालले आहे. शिक्षणातून गळती व बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाने काहीही केलेले नाही आणि करेल, असे वाटत नाही. देशात १४० वर्षांपूर्वी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा प्रयोग झाला. त्याचपध्दतीने महात्मा गांधी मुस्लिम विद्यापीठाची निर्मिती करण्याचा उद्देश आहे. या विद्यापीठाव्दारे मुस्लिम व दलित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान व व्यावसायिक शिक्षण देता येईल. या विद्यापीठामुळेच मुस्लिमांची शैक्षणिक व इतर प्रगती शक्य आहे.
प्रश्न : आज मुस्लिमांची शैक्षणिक अवस्था काय आहे ?
उत्तर : सच्चर व रंगनाथन समितीने मुस्लिमांच्या शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाकडे लक्ष वेधले आहे. ‘हिंदी है हम हिंदोस्ता हमारा’तर्फे आम्ही मागणी केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मेहमूदउर्र रहेमान समितीची नियुक्ती केली. या समितीनेही मुस्लिमांना पाच टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे. मात्र मुस्लिमांसाठी आजपर्यंत काहीही झालेले नाही. रस्त्यावर छोटे उद्योग करून उदरनिर्वाह करणाऱ्या मुस्लिम समाजबांधवांना तांत्रिक व उच्च शिक्षणाची सुविधा मिळत नसल्याने त्यांना आर्थिक स्थैर्य नाही. रोजगार नसल्याने तरुण हतबल आहेत.
प्रश्न : महात्मा गांधी मुस्लिम विद्यापीठ कसे काम करणार आहे ?
उत्तर : लोकसहभाग व लोकचळवळीतून महात्मा गांधी मुस्लिम विद्यापीठाची स्थापना करण्याचे उद्दिष्ट आहे. शासनाचे नियंत्रण असलेले खासगी विद्यापीठ एक हजार एकर क्षेत्रात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक हजार एकर जमीन व एक हजार कोटी रुपये निधी लागणार आहे. या विद्यापीठात मुस्लिमांसोबत सर्वांनाच शिक्षणाची सुविधा देण्यात येईल. २०१७ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात पाच एकर जागेत विद्यापीठाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात स्वयंरोजगार, छोटे व्यवसाय करणाऱ्यांना मार्गदर्शन, महिलांचे शिक्षण, आरोग्य व सुरक्षेबाबत मदतीसह अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शिक्षणातून परिवर्तन, ज्ञान हे शक्तीकेंद्र ही आमची घोषणा आहे. मुस्लिमांच्या सर्व समस्यांचे उत्तर शिक्षण हेच आहे. विद्यापीठाच्या उभारणीसाठी सर्वांची उत्स्फूर्त मदत मिळत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात याबाबत जागृती करण्यात येत आहे.
प्रश्न : विद्यापीठासाठी शासनाकडून कोणती मदत मिळाली?
उत्तर : महात्मा गांधी मुस्लिम विद्यापीठासाठी २००६ पासून आघाडी शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र केवळ चर्चेशिवाय काहीही झाले नाही. आता युती शासनाकडून काही प्रतिसाद मिळेल, असे वाटत नाही. मात्र शासनाने मदत केली तर आम्ही घेणार आहोत. प्रत्येक राजकीय पक्षात असलेल्या मुस्लिम नेतेमंडळींकडूनही समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही करण्यात आलेले नाही. त्यामुळे लोकसहभागातून मुस्लिम विद्यापीठाची चळवळ सुरू केली आहे.
४सदानंद औंधे

Web Title: Educational progress is the answer to all the questions of the Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.