शैक्षणिक संस्थांची दुकानदारी मोडणार
By Admin | Updated: May 20, 2016 00:06 IST2016-05-19T22:51:13+5:302016-05-20T00:06:56+5:30
शिवाजीराव नाईक : इस्लामपूर येथे शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचा मेळावा उत्साहात
शैक्षणिक संस्थांची दुकानदारी मोडणार
इस्लामपूर : शैक्षणिक संस्था व शाळांनी स्वत:च दुकानदारी चालू केल्याने शैक्षणिक साहित्य विक्रेते व व्यापाऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. संस्थांनी ज्ञानदानाचा आपला मूळ हेतू बाजूला ठेवून व्यापार चालविला आहे. याबाबत शिक्षणमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांकडून संबंधित शैक्षणिक संस्थांवर नियमानुसार कारवाई करायला भाग पाडू, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले.
येथे राज्यातील शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी नाईक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाजपचे प्रदेश सचिव संजय उपाध्याय अध्यक्षस्थानी होते. शिक्षक नेते, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख श्रीनिवास नागे, संघटनेचे राज्याध्यक्ष नाना कांबळे, राज्य संघटक मोहन पाटील, उपाध्यक्ष विनायक मोहिते, लक्ष्मीकांत मिनीयार, सुनील वायचळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
भगवानराव साळुंखे म्हणाले, संघटनेच्या मागण्या योग्य असून याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. खासगी शिकवणी वर्ग, शिक्षण संस्था यांनी बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य विक्रीचे काम थांबविले नाही, तर आमची ताकद या संघटनेच्या पाठीशी उभी करु.
संजय उपाध्याय म्हणाले, शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनच्या मागण्यांचा जो लढा उभा केला आहे, त्याचा सरकारदरबारी पाठपुरावा करु.
आ. जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉलद्वारे मेळाव्यास शुभेच्छा देऊन, संघटनेच्या न्याय्य मागण्यांबाबत विरोधी पक्ष गटनेता या नात्याने सरकारदरबारी पाठपुरावा करु, असे स्पष्ट केले. प्रा. शामराव पाटील, सर्जेराव यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात विद्यार्थ्यांना गणवेश व अन्य शैक्षणिक साहित्य शाळांमधून विक्री करु नये, हे साहित्य ठराविक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करु नये, गणवेश अथवा साहित्यामध्ये बदल करावयाचा असल्यास एक वर्ष अगोदर सूचना देणे बंधनकारक करावे, व्यापारी संघटनेशी राजकीय पक्षाने चर्चा केल्याशिवाय बंद पुकारु नये, यांसह इतर ठराव करण्यात आले.
सकाळी शहरातून पुस्तक व ग्रंथदिंडी काढण्यात आली. व्ही. बी. स्वामी यांनी स्वागत केले. नाना कांबळे यांनी संघटनेची माहिती दिली. मेळाव्यात व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना नरेंद्र नंदू, जुगलभाई देदीया, मणीभाई गाला, अमृतभाई शहा, सदानंद कोरगावकर यांनी उत्तरे दिली. विनायक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष उमेश कुरळपकर यांनी आभार मानले. मोहन पाटील, अभय शहा, गौरव शहा, मनोज जैन, नाथाजी अवघडे, अभिजित पाटील, अशोकराव पाटील, रेखा भोसले यांनी मेळावा यशस्वितेसाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)
न्यायालयात धाव
राज्य संघटक मोहन पाटील (इस्लामपूर) म्हणाले की, ज्या शाळा, संस्था बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य विक्री करतील, त्यांच्याविरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. शाळांमधील या दुकानदारीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे शासनानेही या कर चुकवेगिरीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.