इस्लामपूरच्या सुपुत्राने बनविले शैक्षणिक अॅप
By Admin | Updated: June 12, 2016 01:05 IST2016-06-12T01:05:49+5:302016-06-12T01:05:49+5:30
दुर्गम भागातही कार्य : संगणकाशी नाते

इस्लामपूरच्या सुपुत्राने बनविले शैक्षणिक अॅप
युनूस शेख ल्ल इस्लामपूर
संस्कारक्षम अशा एका श्रेष्ठ बालकाची निर्मिती करणे म्हणजे शंभर शाळांची निर्मिती करण्यापेक्षा अधिक महान कार्य आहे, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगून ठेवले आहे. हीच उक्ती कृतीमध्ये उतरवत इस्लामपूरचे सुपुत्र सागर मधुकर पतंगे या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने तब्बल आठ शैक्षणिक मोबाईल अॅप निर्माण करून, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेकविध संकल्पनांच्या पंखांचे बळ दिले आहे.
सागर पतंगे हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तामिणे या, मोबाईलची रेंज नसलेल्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या सहा वर्षांपासून ज्ञानदान करीत आहेत. अशा दुर्गम भागात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यासंबंधीच्या संकल्पना नेहमीच त्यांच्या डोक्यात रुंजी घालत होत्या. या संकल्पनांना संगणक शास्त्रातील रौप्यपदक विजेते असलेले त्यांचे बंधू संतोष पतंगे यांच्या सॉफ्टवेअर विषयातील ज्ञानाची जोड मिळाली आणि या दोघा भावांच्या परिश्रमातून आठ शैक्षणिक मोबाईल अॅपची निर्मिती झाली.
राज्याचे शिक्षण सचिव के. नंदकुमार नेहमीच तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाच्या प्रसारासाठी आग्रही असतात. त्यांचीच प्रेरणा घेऊन पतंगे यांनी ही अॅप्लिकेशन्स बनवली. परिपाठ, शिक्षक डायरी, शालेय वेळापत्रक, शालेय पोषण आहाराचा हिशेब करणारे अॅप, विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या जगप्रसिध्द व्यक्तींची माहिती देणारे ‘किमयागार’ हे अॅप, तसेच आठवणीतील कविता, मराठी सुविचार, इंग्रजी कविता अशी इतरही अॅप विकसित केली आहेत.
ही अॅप्लिकेशन्स तयार करताना ती इंटरनेटशिवाय चालावीत, तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना सोयीस्कररित्या वापरता यावीत, या गोष्टींकडे त्यांनी कटाक्ष ठेवला आहे. ही सर्व अॅप्लिकेशन्स कोणतेही आॅनलाईन टूल न वापरता गुगलचे कडक नियम व अटी पाळून व्यावसायिक पध्दतीने तयार केली आहेत. त्यामुळे ही सर्व अॅप्लिकेशन्स गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येतात. शिक्षक व पालकांत ही अॅप्लिकेशन्स आवडीची झाली आहेत.