जिल्ह्यात अर्थकल्लोळ...
By Admin | Updated: November 9, 2016 23:21 IST2016-11-09T23:21:59+5:302016-11-09T23:21:59+5:30
अर्थचक्र विस्कळीत एटीएम, बँका बंद

जिल्ह्यात अर्थकल्लोळ...
सांगली : केंद्र सरकारने मंगळवारी रात्री जाहीर केलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्दच्या निर्णयानंतर जिल्ह्याचे अर्थचक्रच बुधवारी विस्कळीत झाले. जिल्ह्यातील सर्व बॅँका व एटीएम बंद असल्याने ग्राहकांच्या अस्वस्थतेत भर पडली. पेट्रोल पंपावरील ५०० रुपयांच्या पेट्रोल खरेदीच्या सक्तीचा मन:स्तापही ग्राहकांना सहन करावा लागला. बुधवारी जिल्ह्यातील ४७५ बॅँकांसह मार्केट कमिटी, सराफ बाजारपेठ आदींसह जिल्ह्यातील एक हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते.
पेट्रोलपंप : कर्मचाऱ्यांची मनमानी
या निर्णयामुळे अगोदरच चिंतेत असलेल्या ग्राहकांना बुधवारी दिवसभर पेट्रोल पंपांवर मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. सरकारने पेट्रोल पंपांवर पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे सांगितले असतानाही, शहरातील अनेक पंपांवर थेट पाचशे किंवा हजार रुपयांचेच पेट्रोल विकले जात होते. त्यापेक्षा कमी पेट्रोल हवे असल्यास सुटे पैसे आणा, अशी सक्ती केली जात होती. तरीही हुज्जत घालणाऱ्या ग्राहकास सरळ पेट्रोल संपल्याचे सांगितले जात होते.
किरकोळ भाजी : विक्रेत्यांची पंचाईत
दररोज किरकोळ भाजी विकून चरितार्थ चालविणाऱ्या भाजी विक्रेत्यांची मात्र, बुधवारी दिवसभर पंचाईत झाली. नेहमी ग्राहकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या शहरातील शिवाजी मंडई, जुनी भाजी मंडई, मारूती चौक परिसरातील भाजी विकेत्यांना दिवसभर अडचणींना सामोरे जावे लागले. दररोज भाजी खरेदी करताना सुटे पैसे देणारे ग्राहक आज मात्र, ‘पाचशेची नोट घेणार काय?’ अशी विचारणा करत होते. या भाजी विक्रेत्यांना केवळ पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्या, एवढीच माहिती असल्याने विक्रेतेही ग्राहकाला माहिती देत, ‘आम्ही घेऊन काय करायचे?’ असा सवाल करत होते. अनेक ग्राहक, ‘दोनशे रूपयांची भाजी घेतो, मात्र पाचशेची नोट देणार,’ अशी आडमुठी भूमिका घेत होते. घाऊक व्यापाऱ्यांनी हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारल्या नाहीत.
महापालिकेची करवसुली ठप्प
सांगली : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर बुधवारी नागरिकांनी सकाळपासूनच महापालिकेत कर भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. पण प्रशासनाने मोठ्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने नागरिक कर न भरताच परतले. दिवसभरात घरपट्टी, पाणीपट्टीपोटी प्रत्येकी केवळ दोन लाखाचीच वसुली होऊ शकली. मिरज विभागीय कार्यालयात तर, नागरिकांना नोटा स्वीकारणार नसल्याचे लेखी लिहून देण्याची वेळ प्रशासनावर आली. महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून दररोज १४ ते १५ लाखाची वसुली होत आहे. बुधवारी दिवसभरात केवळ दोन लाखाची वसुली झाली. तीही मिरज कार्यालयात. सांगलीच्या कार्यालयात एक रुपयाही कर जमा झाला नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचीही अवस्था अशीच होती. पाणीपट्टीपोटी सोमवारी २४ लाख, तर मंगळवारी १७ लाखाची वसुली झाली होती. बुधवारी केवळ दीड लाख रुपये वसूल झाले. एलबीटी विभागाकडे तर एक रुपयाचाही भरणा होऊ शकला नाही.
हॉटेलमध्ये पहिली विचारणा... ‘सुटे आहेत ना..?’
हॉटेलमध्ये चहापान, अल्पोपहारासाठी गेल्यानंतर नेहमी पहिल्यांदा पाणी देऊन आॅर्डर घेतली जाते. मात्र, बुधवारी हॉटेलमधील वेटर, ‘सर, सुटे पैसे आहेत ना?, पाचशेची नोट घेतली जाणार नाही,’ अशी विनंतीवजा सूचना देत होते. शहरातील काही मोठ्या आणि नामवंत हॉटेलमध्ये मेनू कार्डच्या पहिल्या पानावरच ‘पाचशे व एक हजार रूपयांची नोट स्वीकारण्यात येणार नाही’ असा कागद चिकटविण्यात आला होता. त्यातूनही काही हॉटेलमध्ये बिल देताना ग्राहकांनी पाचशे अथवा हजाराची नोट काढली, तर वादावादी होत होती.
जिल्हा बँकेची तयारी पूर्ण
सांगली : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन करीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गुरुवारपासूनच्या नव्या आर्थिक व्यवहाराची सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाभर बँकेच्या शाखांमधून चांगली सेवा देण्याचे आश्वासन बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
ते म्हणाले की, गुरुवारपासून बँकेचे कामकाज पूर्ववत होईल. गुरुवारी सायंकाळपासून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या व्यवहाराबद्दलची सर्व माहिती रिझर्व्ह बँकेला कळविण्याचे आदेश आले आहेत. त्याप्रमाणे यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लोकांनी गोंधळून न जाता शिस्तबद्धरित्या व्यवहार करावेत. शासनाचा हा निर्णय चांगला आहे, त्याचे आम्ही स्वागत करीत आहोत, असेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)