चांदोली उद्यानासाठी इको-डेव्हलपमेेंट कमिटी

By Admin | Updated: September 24, 2015 23:56 IST2015-09-24T22:45:07+5:302015-09-24T23:56:20+5:30

मणदूर ग्रामस्थांच्या पुढाकाराची गरज : पर्यटन विकास बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Eco-development committee for the Chandoli garden | चांदोली उद्यानासाठी इको-डेव्हलपमेेंट कमिटी

चांदोली उद्यानासाठी इको-डेव्हलपमेेंट कमिटी

कोकरुड : चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन विकासासाठी मणदूर गावच्या ग्रामस्थांनी इको-डेव्हलपमेंट कमिटी स्थापन करून चांदोली धरणामध्ये बोटिंगचा प्रस्ताव वन खात्याने त्वरित शासनाकडे पाठवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केली. ते चांदोली पर्यावरण व पर्यटन विकासाच्या बैठकीप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, कार्यकारी अभियंता जे. जे. बारदेस्कर व विभागीय वन अधिकारी एम. एम. पंडितराव, जि. प. सदस्य रणधीर नाईक व रामचंद्र पाटील उपस्थित होते. मणदूर ग्रामस्थांनी पर्यटन विकासाच्या वाढीसाठी वन खात्याच्या शामप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत कमिटी स्थापन करून अभयारण्यामध्ये ट्रेकिंग सुविधा तसेच एमटीडीसीमार्फत टुरिस्ट सेंटर स्थापन करून पर्यटकांना सुविधा द्यावी व परिसरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच चांदोली अभयारण्याची माहिती पर्यटन विकास मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करून बेंगळूर व पुणे राष्ट्रीय महामार्गावर उद्यानाचे दिशादर्शक बोर्ड लावण्याच्याही सूचना यावेळी करण्यात आल्या, तर आ. शिवाजीराव नाईक यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या चांदोली धरणाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या रिकाम्या जागेचा आराखडा तयार करून शासनाकडे सादर करावा व ती जागा पर्यटनासाठी विकसित करण्याची सूचना नाईक यांनी केली. पैठणच्या धर्तीवर धरणाच्या पायथ्याशी बाग विकसित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अभयारण्याजवळ असणाऱ्या खुंदलापूर गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर असून, तेथील लोकांना शेतीच्या व नागरी सुविधा मिळवून द्याव्यात. खुंदलापूर गावाभोवती तारेचे कुंपण बांधून रानटी प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोळेकरवाडी, मिरुखेवाडी व जाधववाडी येथील ग्रामस्थांनी गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने व बाणीच्या ओढ्यावरून वन खात्याचे अधिकारी जाऊ देत नसल्याची तक्रार यावेळी केली. काही नगरपालिका व महापालिका बेवारस माकडे व कुत्री अभयारण्यामध्ये आणून सोडत असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी राज्य पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी वैशाली चव्हाण, प्रल्हाद पाटील, मोहन पाटील, गटविकास अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार विजय पाटील, प्रांंताधिकारी दादासाहेब कांबळे, वनक्षेत्रपाल प्रजोत पालवे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रवीण साळुंखे, माहिती अधिकारी संपदा बिडकर यांच्यासह मणदूर, खुंदलापूर, जाधववाडी, कोेळेकरवाडी, मिरुखेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)


दहा एकर जागा विकसीत करा
चांदोली अभयारण्याजवळ मत्स्य बिजासाठी कृष्णा खोरे महामंडळाने १० एकर जागा दिली आहे. ती विकसित करून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच पर्यटकांसाठी याठिकाणी सर्प उद्यानाची निर्मिती करून पर्यटकांना पर्यटनाचा लाभ करून देण्याची सूचना आ. नाईक यांनी केली. खुंदलापूर गावाभोवती तारेचे कुंपण बांधून रानटी प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्याची गरज असून यावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Eco-development committee for the Chandoli garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.