संजयकुमार चव्हाण - मांजर्डे तासगाव तालुक्याचा पूर्व भाग मांजर्डे, आरवडे, पुणदी, पेड, वायफळे, बलगवडे, सावळज हा भाग कायम दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. कायम दुष्काळाच्या वणव्यात होरपळणारा हा तालुक्याचा भाग यावर्षीही पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. शेतीबरोबरच पाण्याचा प्रश्नही आता गंभीर बनत चालला आहे. या भागातील विसापूर, पुणदी उपसा सिंचन योजनेसह असणाऱ्या अन्य योजनाही पाच महिने बंद आहेत. तालुक्याच्या या भागात असणाऱ्या तलावांचा पाणीसाठा जवळजवळ मृत होण्याच्या मार्गावर आहे. निळे, बलगवडे या तलावातील पाणीसाठा तसा अपुराच आहे. त्यात पुणदी, पेड, मोराळे या तलावातील पाणीसाठाही पंधरा ते वीस दिवस पुरेल इतकाच आहे, असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. मान्सूनच्या पावसाने यावेळी वेळेत हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी पूर्ण अंशाने केली. परंतु पेरणीनंतर मात्र पावसाने पूर्ण दडी मारली. पावसाच्या या दडीने शेतकऱ्यांची पिके आता वाळून गेली आहेत. उगवून आलेली कोवळी पिके अक्षरश: करपून गेली आहेत. पावसाच्या या हुलकावणीमुळे परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या मोठ्या संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे. खरीपातील सर्व पिके पाण्याअभावी करपून गेल्याने हा हंगामही वाया गेला आहे. त्यातच परिसरात पिण्याच्या पाण्याच्या समस्येनेही तोंड वर काढले आहे. २00१ पासून आजपर्यंत तीन ते चार वेळा या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. सद्यपरिस्थितीत भागातील द्राक्ष, ऊसशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मागील काही वर्षापासून अशा पडणाऱ्या दुष्काळामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बळिराजा अक्षरश: पिचून गेला आहे. सध्या खरीप हंगाम वाया गेला आहेच, पण यापुढे पुरेसा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठी असणार आहे.या भागातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरु कराव्यात, पुणदी, विसापूर उपसा सिंचन योजना सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पाणी योजना सुरु करून या भागातील तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तासगाव पूर्व भाग दुष्काळाच्या वणव्यात
By admin | Updated: September 2, 2015 23:38 IST