खानापूर पूर्व भाग दुष्काळाच्या झळांनी हवालदिल
By Admin | Updated: August 31, 2015 21:38 IST2015-08-31T21:38:43+5:302015-08-31T21:38:43+5:30
खरीप हंगाम वाया : पावसाची दडी; पुन्हा पाणीटंचाई व चाराटंचाई; उन्हाच्या तीव्रतेत वाढ

खानापूर पूर्व भाग दुष्काळाच्या झळांनी हवालदिल
पांडुरंग डोंगरे ल्ल खानापूर
मान्सूनच्या पावसाने गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारल्याने खानापूर पूर्व भागातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यातच आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. परिणामी खरीप पिके करपली असून विहिरी, कूपनलिकांचे पाणी संपत आल्याने खानापूर पूर्व भागात पुन्हा दुष्काळ जाणवू लागला आहे.
खानापूर पूर्व भाग उंच व घाटमाथ्याचा असल्याने येथे पावसाचे प्रमाण नेहमीच कमी राहते. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती कायमच असते. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र आॅगस्टनंतर दर तीस दिवसानंतर अवकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे गत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. जून महिन्यात एक आठवडाभर पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली. परिणामी शेतकऱ्यांनी गडबडीने खरीप पेरणी उरकली. मात्र जूननंतर पावसाने आजअखेर पूर्ण दडी मारल्याने चांगला असलेला खरीप हंगाम वाया गेला आहे. संकरित ज्वारी, देशी ज्वारी, उडीद, सोयाबीन, भुईमूग आदी पिके करपली आहेत.
खरीप हंगामाबरोबरच बागायत पिकांची अवस्थाही दयनीय झाली आहे. खानापूर पूर्व भागात निर्यातक्षम द्राक्षशेती केली जाते. पावसाचा द्राक्षशेतीवरही विपरित परिणाम झाला आहे. गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसास तोंड देत द्राक्ष हंगाम कसा तरी पार पडला. चालूवर्षी अवकाळीऐवजी कमी पाऊस व कमी पाण्यास तोंड द्यावे लागत आहे. सध्या द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात छाटणीची काम केली जाणार आहेत. परंतु पावसाच्या उघडीपीमुळे तसेच पाणीटंचाईमुळे द्राक्षकाडी पाहिजे तशी होत नसल्याने चालूवर्षीचा द्राक्ष हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. पावसाने अजून दडी मारली, तर बहुतेक द्राक्ष बागायतदार ‘छाटणी’ रद्द करण्याच्या मनस्थितीत आहेत. हीच अवस्था डाळिंब बागायतदारांची आहे.
खानापूर पूर्व भागातून वाहणारी अग्रणी नदी, पापनाशी ओढा गेल्या दीड महिन्यापासून कोरडा ठणठणीत पडला आहे. पूर्व भागातील खानापूर, ढोराळे, बलवडी (खा.), रामनगर, हिवरे, सुलतानगादे येथील पाझर तलावामधील पाणी पातळीने तळ गाठला आहे. अग्रणी नदीवरील तसेच इतर बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नसल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. विहिरी, कूपनलिकांचे पाणी खाली गेले आहे. ज्या कूपनलिकांना पाणी आहे, त्याही जेमतेम तासभर सुरू राहत आहेत.
पावसाळा संपत आला तरी एकही दमदार पाऊस पडलेला नाही. रिमझिम पाऊसही बेपत्ता झाल्याने श्रावण महिन्यात दिसणारे हिरवेगार वातावरण दिसेनासे झाले आहे. सगळीकडे रखरखीतपणा जाणवत असल्याने उन्हाळाच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शेतातील बांध, माळरान, पडिक क्षेत्र येथे खुरट्या गवताचीही उगवण झाली नसल्याने शेळ्या-मेंढ्यांबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैरणी संपल्या, ओला चारा नाही, अशा परिस्थितीत जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकरी वर्गास पडला आहे. शेतीबरोबरच खानापूर पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पूर्व भागातील हिवरे, पळशी, बाणूरगड येथे गेल्या महिन्यापासून टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. करंजे, भडकेवाडी, रेवणगाव, येथेही टँकरची मागणी होत असून येत्या पंधरा दिवसात पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची भीती आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी, तर जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावणी सुरू करावी, अशी मागणीही होत आहे.