पूर्व भागाची होरपळ सुरू!
By Admin | Updated: March 23, 2015 00:44 IST2015-03-22T23:59:32+5:302015-03-23T00:44:59+5:30
वातावरण निवळले : मार्चअखेरीस पारा जाणार ३९ अंशावर

पूर्व भागाची होरपळ सुरू!
प्रवीण जगताप - लिंगनूर -सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील वातावरण आता निवळले आहे. अवकाळी पावसाने गेल्या पंधरवड्यात सलग चारवेळा खेळ मांडला असताना, आता वातावरण पूर्वपदावर येऊ लागले आहे. अवकाळी ढग बाजूला जात असतानाच आता सूर्याने आग ओकण्यास सुरूवात केली आहे. तापमानाचा पारा मार्चअखेरीस ३९ अंशापर्यंत वर सरकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या संकेतस्थळावरून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अवकाळीच्या धारांनंतर आता उन्हामुळे अंगाची लाही लाही होत घामाच्या धारा सुरू होणार, असे चित्र निर्माण झाले आहे.
सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ व जत तालुका कोरडा समजला जातो. येथील उन्हाळा अधिक तीव्र होताना दरवर्षी अनुभवास येतो. अशातच मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चारवेळा अवकाळी पावसाने धिंगाणा घातल्याने, बिगरमोसमी वातावरणाचा अनुभव शेतकऱ्यांसह सर्वांनाच आला. या अवकाळीने सर्वच शेतीपिकांचे नुकसान केले.
पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. तूर्तास अवकाळी ढग निवळत असताना, दुसरीकडे उन्हाळा मात्र अधिक प्रखर होऊ लागला असून तीन दिवसांपासून सकाळी ११ पासूनच उन्हाचे चटके सायंकाळी पाच वाजेपर्यंत सामान्य जनतेला, तसेच फळपिके व भागातील भाजीपाल्यालाही सोसावे लागत आहेत. आता अशातच जिल्ह्याच्या पूर्व भागात यंदा सारा शिवार गार करणाऱ्या ‘म्हैसाळ’ आवर्तनाच्या पाण्याचीही नुसती वाफच होते की काय, असे दाहक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा मार्चपासून म्हैसाळचे किमान आवर्तन सुरू होईपर्यंत ही उन्हाची दाहकता अधिकाधिक सोसत राहावी लागणार, हे निश्चित आहे.
‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू न झाल्यास अगदी ३० मार्चपासून उन्हाचा पारा ३९ अंशापर्यंत पोहोचणार असल्याने, उरलेसुरले पाण्याचे स्रोत व साठेही संपणार आहेत. कूपनलिका व विहिरींचे पाणी पूर्ण संपण्याची भीती आहे. पुन्हा खरड छाटणीच्या स्थितीतील द्राक्षबागा, फळपिके, भाजीपाला यांची शेती पाण्याअभावी संकटात येऊ शक ते. (वार्ताहर)
योजनेच्या पाण्याबाबतही चिंता
यंदा सारा शिवार गार करणाऱ्या ‘म्हैसाळ’ आवर्तनाच्या पाण्याचीही नुसती वाफच होते की काय, असे दाहक चित्र निर्माण झाले आहे.
चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. २३ मार्च : ३८ , २९ व ३० मार्च : ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे.