‘ई पीक’ नोंदणीला मुदतवाढ, तरीही तांत्रिक अडचणी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:12+5:302021-09-26T04:28:12+5:30
सांगली : शेतातील पिकांची शेतकऱ्यांनीच नोंदणी करावी, यासाठी १५ ऑगस्टपासून ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ हा ...

‘ई पीक’ नोंदणीला मुदतवाढ, तरीही तांत्रिक अडचणी कायम
सांगली : शेतातील पिकांची शेतकऱ्यांनीच नोंदणी करावी, यासाठी १५ ऑगस्टपासून ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात याला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी नंतर मात्र सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली असली तरी तोपर्यंतही शेतकऱ्यांकडून नोंदणी होण्यास अडचणी राहणार आहेत.
शेतकऱ्यांचे पीक आणि त्याच्या नोंदणीसाठी आत्तापर्यंत तलाठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. शेतकरी जे पीक सांगतील, त्याचीच नोंदणी होत होती. यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून आता ई-पीक पाहणी ॲपव्दारे शेतकऱ्यांनीच आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करावयाची आहे. यासाठी १५ ऑगस्टपासून अभियान सुरू करण्यात आले आहे. शेतकरी स्वत:च नाेंदणी करणार असल्याने यात अचूकता असली तरी अद्यापही हे तंत्रज्ञान नवीन असल्याने त्यातील अडचणी कायम आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये सर्व्हर डाऊनची समस्या अद्यापही कायम आहे. राज्यातील शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्याकडून हाेणारी अपेक्षित नोंदणी यावर क्लाऊडची रचना करणे आवश्यक होते. मात्र, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ॲप सुरू केल्यानंतर ‘सर्व्हरशी जोडत आहे’ इतकाच संदेश येत आहे.
चौकट
...तर तलाठी करणार नोंदणी
ॲपची समस्या ओळखून आता पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतरही शेतकऱ्यांच्या नोंदी प्रलंबित राहिल्या तर तलाठी स्वत: नोंदी घेणार आहेत. तरीही शेतकऱ्यांसाठी फलदायी असलेल्या या तंत्रज्ञानातील समस्या राज्य पातळीवरून सोडविण्याची गरज आहे.