रहिवासी क्षेत्रात विहिरी धोकादायक

By Admin | Updated: March 9, 2015 23:47 IST2015-03-09T23:34:17+5:302015-03-09T23:47:05+5:30

विट्यातील प्रकार : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

Dwelling wells in residential areas | रहिवासी क्षेत्रात विहिरी धोकादायक

रहिवासी क्षेत्रात विहिरी धोकादायक

दिलीप मोहिते -विटा -वाढत्या विटा शहरातील रहिवासी क्षेत्रात नागरी वस्तीतच धोकादायक व पडिक विहिरी असून यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. रहिवासी क्षेत्रातील विहिरी तातडीने बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी पालिका प्रशासनाने धोकादायक व पडिक विहिरी बुजवून टाकण्याबाबत नोटिसा काढूनही मालकांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
विटा शहरात रहिवासी क्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी शहराबाहेर असलेल्या विहिरी आता रहिवासी क्षेत्रात आल्या आहेत. ज्या विहिरीवर शेतीत बागायती पिके घेतली जायची, ती शेती आता प्लॉट पाडून विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे या अनेक विहिरी आता पडिक व विनावापराच्या झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. नागरी वस्तीत मध्यभागी असलेल्या या विहिरीच्या बाजूनेच रस्ते गेले आहेत. यातील अनेक विहिरी गेल्या अनेक वर्षांपासून पडिक आहेत. या विहिरींना संरक्षण कठडे किंवा तेथे विहीर असल्याचे निदर्शनास येण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी मायणी रस्त्यावरील एका विहिरीत तीन लहान शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांना धोकादायक ठरणाऱ्या रहिवासी क्षेत्रातील या विहिरी तातडीने बुजवून टाकाव्यात, अशी मागणी होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर विटा पालिका प्रशासनाने शहरातील गावभागासह उपनगरांतील रहिवासी क्षेत्रात असणाऱ्या काही धोकादायक व विनावापरातील विहिरींचा शोध घेऊन संबंधित मालकांना धोकादायक विहिरी बुजविण्याबाबत नोटिसाही काढल्या होत्या. मालकांना आठ ते पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती. परंतु, या नोटिसांना तब्बल एक ते दीड वर्ष उलटून गेले, संबंधित मालकांनी त्या नोटिसांना केराची टोपली दाखविल्याचे बोलले जाते.
विटा नगरपालिकेने नोटीस दिल्याच्या मुदतीत विहीर मालकांकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास अशा विहीर मालकांची यादी पोलिसांत देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तरीही विहीर मालकांनी ती ना बुजविली, ना पालिकेने पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या धोकादायक विहिरींचा पुन्हा एकदा सर्व्हे करून संबंधित मालकांना वापरात नसलेल्या पडक्या धोकादायक विहिरी तातडीने बुजवण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांच्या जीविताशी खेळ...
विटा शहरातील नागरी वस्तीत असलेल्या विहिरींमुळे लहान मुले व नागरिकांना मोठा धोका आहे. या विहिरींना कोणतेही संरक्षक कुंपण नाहीच, शिवाय या विहिरी रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पडिक विहिरी बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. परंतु, पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापूर्वी संबंधित विहीर मालकांना नोटिसा काढल्याचे सांगण्यात आले. पण त्या विहिरी आजही तशाच आहेत. याबाबत पालिकेने संबंधितांवर काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे अशा विहीर मालकांना पालिकाच पाठीशी घालून नागरिकांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष संजय भिंंगारदेवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

Web Title: Dwelling wells in residential areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.