चांदोली धरण परिसरात धूळवाफ पेरणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:33+5:302021-06-01T04:19:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात अवकाळी पावसाने लांबणीवर पडलेली खरीप हंगामातील ...

चांदोली धरण परिसरात धूळवाफ पेरणीची लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात अवकाळी पावसाने लांबणीवर पडलेली खरीप हंगामातील धूळवाफ भात पेरणी सुरू झाली आहे. शिवारात सगळी कडे भात पेरणीची धांदल उडाली असून, शेतकरी वर्ग सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत भर उन्हात भात पेरणीची कामे करीत आहेत. शिवार माणसांनी फुलून गेला आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील डोंगरकपारीतील व वाड्यावस्त्यावरील शेतीची मशागत साधारण मेच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्या केली जाते. २५ मेला रोहिणी नक्षत्रावर धूळवाफेवर भात पेरणी होती. पण यंदा अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे शिवारात पाणीच पाणी साचल्याने पेरणी पूर्व मशागत शेतकऱ्यांना करता आली नाही. त्यामुळे 'रोहिणीचा फेरा अन् मोत्याचा तुरा' अशी शेतकरी वर्गात म्हण प्रचलित आहे. तो पेरा यावर्षी करता आला नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोहिणीचा फेरा साधला तो शेतकरी मोत्यासारखे धान्य पिकवतो. मात्र गेल्या आठवड्यात पडलेल्या वळीव पावसाने शेतकऱ्यांना रोहिणीच्या मुहूर्तावर पेरणी करता आली नाही. पण सध्या शेतात घात येताच शेतकरी वर्ग आंतरमशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे. बहुतांशी शेतकरी यांत्रिक वाहनाच्या सहाय्याने रोटर मारून तर काही बैलाच्या साहाय्याने कुळवट करून शेत पेरणी योग्य करण्यात व्यस्त आहेत. बांडग्याच्या साहाय्याने धूळवाफेवर भात पेरणी करीत आहेत. परिसरात भात पेरणीची लगबग जोमात सुरू झाली आहे.
खरीप हंगाम या विभागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, वर्षभराच्या धान्याचे नियोजन आतापासून केले जाते. मृग नक्षत्र निघण्यापूर्वी या डोंगरी भागातील काबाडकष्ट करणारे शेतकरी कोरड्या मातीत भात, भुईमूग, सोयाबीनची पेरणी करतात. यासाठी पारंपरिक, संकरित व संशोधित अशा अनेक जातीच्या वेगवेगळ्या बियाणांची निवड करून शेताच्या प्रतिनुसार पेरणी केली जाते.
चौकट
काही ठिकाणी टोकण पद्धतीने ही पेरणी केल्यानंतर उशिरा पाऊस पडला तरी बियाणे खराब होत नाहीत.
यासाठी ९० ते १२० दिवसांत काढणीला येईल अशा वाणाची निवड केली जाते. यामध्ये कोमल, सोनम, जोंधळे, गोरक्षनाथ, रत्ना १, इंद्रायणी, आर १, बासमती, सिल्की २७७, भोगावती, मेनका, नाथ पोहा, अशा पारंपरिक, संकरित व संशोधित सुधारित जातीच्या बियाणांची निवड केली जाते.