धुरळा संपला; आता साठमारी सरपंचपदासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:29+5:302021-01-20T04:26:29+5:30
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा संपल्यानंतर आता सरपंचपदासाठी साठमारी सुरू होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण महिन्याच्या आत काढणार असल्याची घोषणा ...

धुरळा संपला; आता साठमारी सरपंचपदासाठी
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा संपल्यानंतर आता सरपंचपदासाठी साठमारी सुरू होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण महिन्याच्या आत काढणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कारभाऱ्यांच्या नजरा आरक्षणाकडे लागल्या आहेत.
सरपंचपदासाठी सट्टाबाजार होत असल्याने तसेच जातीचे बोगस दाखले काढण्याचा प्रकार होत असल्याने आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय शासनाने घेतला. यापूर्वी आरक्षण अगोदरच काढल्याने फक्त सरपंचपदासाठीच ताकद लावली जायची. पॅनेल हातातून निसटले तरी सरपंचपद आपल्याकडेच राहिल्याने अंमल अप्रत्यक्षपणे ताब्यात राहायचा. यावेळी मात्र आरक्षण स्पष्ट नसल्याने सर्वच जागांवर काटाजोड लढती झाल्या. आता नेमके संख्याबळ स्पष्ट झाल्याने सरपंचपदासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.
आरक्षण निश्चित नसल्याने सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही गोंधळात आहेत. आरक्षणानुसार उमेदवार पॅनेलमध्ये नसल्यास सरपंचपद कमी संख्याबळाच्या विरोधकांकडे जाण्याचेही संकट आहे. त्यामुळे विजयाचा निर्भेळ आनंद कारभाऱ्यांना साजरा करताना सरपंचपदाची धाकधुकही कायम आहे.
काही गावांत अधिकृत पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांनी अन्य उमेदवार पुरस्कृत केले होते. निवडून आल्यानंतर त्यांचा पाठिंबा कोणाला, यावरही संख्याबळ आणखी स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे आगामी महिनाभर आता अपक्षांच्या खेचाखेचीचा खेळ गावोगावी रंगणार आहे.
चौकट
आमच्याकडेच सर्वाधिक ग्रामपंचायती
निकालानंतरच्या प्राथमिक आकडेवारीनुसार महाविकास आघाडी अव्वल स्थानावर आहे; पण शिवसेनेसह सर्वच पक्षांनी आपल्याकडेच सर्वाधिक ग्रामपंचायती असल्याचा दावा केला आहे. सद्य:स्थितीला कॉंग्रेस २३, राष्ट्रवादी २९, भाजप ३२, शिवसेना १३, महाविकास आघाडी ९ व स्थानिक आघाड्या ३७ असे सत्ताबल आहे.
चौकट
अनेक गावांत ‘मुख्यमंत्री गणप्या गावडे’
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींत अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पॅनेलना समसमान जागा मिळाल्याने सत्तेचा लंबक अपक्षांनी धरून ठेवला आहे. सोमवारी (दि. १८) संध्याकाळी निकाल जाहीर होताच नेत्यांनी अपक्षांना पकडण्याचे प्रयत्न केले; पण ‘सरपंचपदाचे आरक्षण निघू दे, मग पाठिंब्याचा निर्णय घेतो’, अशी पक्की राजकीय भूमिका अपक्षांनी घेतली. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत अपक्ष म्हणजे ऐनवेळी स्वत:च खुर्ची पटकावणारे ‘मुख्यमंत्री गणप्या गावडे’ ठरू शकतात.
कोट
सरपंच कोणाचा, हे आरक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीकडे ग्रामपंचायती किती, यापेक्षा सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचेच निवडून आले, हा आमचा मोठा विजय आहे. वाळवा, शिराळा तालुक्यांत प्रत्येकी दोनच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या, अन्यथा आमचे संख्याबळ आणखी वाढले असते. काही तालुक्यांत भाजपचे बडे नेते असतानाही तेथे आम्ही वरचढ ठरलो आहोत.
- अविनाश पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस.
कोट
जिल्ह्यात चौतीसहून अधिक ग्रामपंचायतींत शिवसेनेने विजय मिळविला आहे. काही ठिकाणी आम्ही पुरस्कृत केलेले उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक नेत्यांचा दबाव असल्याने भूमिका लगेच जाहीर केलेली नाही. सरपंचाच्या आरक्षणानंतर ते निर्णय स्पष्ट करतील. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायती आणखी वाढतील, हे निश्चित आहे.
- संजय विभूते, जिल्हाध्यक्ष, शिवसेना.