वाजंत्री विकताहेत दुर्वा आणि फुले, तर मंडप व्यावसायिक दबले कर्जाच्या ओझ्याखाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:19+5:302021-09-12T04:31:19+5:30
सांगली : गणरायाच्या आगमनाने अवघ्या भक्तगणांत उत्साहाचे वातावरण आहे, पण उत्सवावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या घरात मात्र चूलही पेटलेली नाही. ...

वाजंत्री विकताहेत दुर्वा आणि फुले, तर मंडप व्यावसायिक दबले कर्जाच्या ओझ्याखाली!
सांगली : गणरायाच्या आगमनाने अवघ्या भक्तगणांत उत्साहाचे वातावरण आहे, पण उत्सवावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या घरात मात्र चूलही पेटलेली नाही. बॅंडपथकात काम करणाऱ्या वाजंत्र्यांवर उत्सवकाळात दुर्वा आणि फुले विकून पोट भरण्याची वेळ आली आहे.
मंडप व्यावसायिकांसाठी गणेशोत्सव आणि नवरात्र हे सुगीचे दिवस ठरतात. गेल्या महिन्यात शासनाने निर्णय घेताना १०० चौरस फुटांच्या मंडपाला परवानगी दिली होती, त्यामुळे व्यावसायिकांना धंद्याची अपेक्षा होती. प्रत्यक्ष उत्सवापूर्वी मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मंडपांना परवानगी नाकारली. उधार-उसनवार करून साहित्य खरेदी केलेले व्यावसायिक आता कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. मंडळांनी दोन-चार टेबल, रोषणाईच्या काही माळा आणि थोडे रंगीत कापड इतकीच मागणी केली. ऐन उत्सवाच्या व व्यवसायाच्या काळात मंडप व्यावसायिकांना हातावर हात बांधून बसावे लागले आहे.
चौकट
सुपाऱ्यांचे पैसे परत नेले
बॅंड पथकांची अवस्थाही अशीच आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्याने मिरवणुकांना परवानगी मिळेल, अशी पथकांना अपेक्षा होती. महिन्याभरापासून त्यांचा सरावही सुरू होता. नदीकाठी ढोलांचे आवाज घुमत होते. पण या साऱ्यावरच प्रतिबंध आल्याने उत्साहावर विरजण पडले आहे. मंडळांनी दिलेल्या सुपाऱ्यांचे पैसे परत नेले आहेत.
कोट
गेली दीड वर्षे व्यवसाय पूर्णत: ठप्प आहे. महापालिका क्षेत्रात ६०० हून अधिक मंडप व्यावसायिक आहेत. मोठे व्यावसायिक कसेबसे तग धरून असले तरी, छोटे व्यावसायिक मात्र उद्ध्वस्त झाले आहेत. गणेशोत्सवात चांगल्या व्यवसायाची अपेक्षा होती, त्यासाठी मोठी गुंतवणूकही केली होती. पण शासनाने ऐनवेळेस मंडपांना परवानगी नाकारल्याने मोठा फटका बसला आहे.
- संतोष माळी, मंडप, संचालक, लायटिंग व डेकोरेशन असोसिएशन
बॅंड पथकांना लग्नाच्या हंगामात रुपयाचाही व्यवसाय करता आला नाही. गणेशोत्सवात चांगल्या व्यवसायाची अपेक्षा होती. मंडळांनी आगाऊ पैसेही दिले होते, पण मिरवणुकांवर बंदी आणल्याने सगळाच धंदा बंद झाला आहे. आमचे वाजंत्री सेंट्रिंग किंवा वीटभट्ट्यांवर कामाला जात आहेत. काहींनी उत्सवात फुले, दुर्वा फळे विकून चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला.
- नंदकुमार जाधव, मोरया ब्रास बॅण्ड कंपनी, हरिपूर.