पावसाळ्यातही जतसाठी ८० टँकर
By Admin | Updated: June 13, 2016 00:10 IST2016-06-12T23:05:36+5:302016-06-13T00:10:47+5:30
अत्यल्प पाऊस : तालुक्यातील ५६६ गावांना पाणी पुरवठा

पावसाळ्यातही जतसाठी ८० टँकर
जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील सत्तर गावे आणि त्याखालील ५६६ वाड्या-वस्त्यांवर ८० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६५ मि.मी. इतके आहे. आजअखेरपर्यंत तालुक्यात फक्त १८ टक्के पावसाची नोंद येथे झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.
बिळूर, जत, शेगाव परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे, तर डफळापूर व संख परिसरात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. माडग्याळ आणि उमदी परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. गतवर्षी तालुक्यात फक्त ५७ टक्के पाऊस झाला होता. कडक ऊन व अत्यल्प पाऊस यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. मागील आठ-दहा दिवसात जत तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. सर्वच ओढे-नाले, साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. त्यामुळे काही भागात समाधानकारक पाऊस पडूनही चारा व पाणी टंचाईची तीव्रता कमी झालेली नाही. तालुक्यातील चारा व पाणीटंचाई कमी होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. परंतु डोण भागातील काळ्या जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही. जमिनीत फक्त पाच ते सहा इंच खोल ओलावा निर्माण झाला आहे. जत, शेगाव, डफळापूर, बनाळी, बिळूर, उमराणी परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरण्या केल्या आहेत. मागील तीन-चार दिवसात अजिबात पाऊस झाला नाही. सकाळ-सायंकाळ हवेत गारवा निर्माण होत आहे. शनिवारी सकाळी काही प्रमाणात धुके पडले होते. दिवसभर ऊन पडत आहे. हवेत उकाडा जाणवत आहे. त्यामुळे खरीप हंगाम पेरणी केलेले शेतकरी हवालदिल होऊ लागले आहेत.
मे महिन्यात जत तालुक्यात ८९ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. राज्यात सर्वाधिक टँकर जत तालुक्यात सुरु आहेत, असे प्रशासकीय अधिकारी खासगीत बोलताना सांगत होते. जून महिन्याच्या सुरुवातीस काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे प्रशासनाने बनाळी, बिळूर व जत परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नऊ टँकर बंद केले आहेत.3
असा राबविला उपक्रम...
जत तालुक्याची लोकसंख्या तीन लाख २४ हजार इतकी आहे. त्यापैकी एक लाख ९८ हजार ९२८ नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तालुक्याच्या पश्चिम, दक्षिण, उत्तर भागात पाणी व चारा टंचाईची तीव्रता कमी प्रमाणात असली तरी, पूर्व भागात भयानक पाणी आणि चाराटंचाई जाणवत आहे. प्रशासनाने त्यावर उपाययोजना करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.