स्वच्छता अभियानावेळी अतिक्रमणे हटविली
By Admin | Updated: November 20, 2014 00:24 IST2014-11-20T00:10:50+5:302014-11-20T00:24:02+5:30
इस्लामपुरात कारवाई : व्यापारी संतप्त; वीसजणांवर गुन्हा दाखल

स्वच्छता अभियानावेळी अतिक्रमणे हटविली
इस्लामपूर : शहरात नगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर मोमीन मोहल्ला परिसरातील आझाद चौकात असणाऱ्या दुकानांसमोरील अतिक्रमणे जेसीबीने हटवली. यामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. पालिकेच्या विनानोटीस मोहिमेमुळे संतप्त झालेल्या व्यापारी व त्यांच्या समर्थकांनी हे काम बंद पाडून जेसीबी चालकाला घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे व्यापाऱ्यांनी जेसीबी चालक व अनोळखी १५ ते २० जणांविरुध्द पोलिसांत तक्रार दिली.
फैजल हमीदुल्ला पटवेकर, अफजल रियाज इबुशे व सुहेल जब्बार पठाण या तीन व्यापाऱ्यांनी ही तक्रार दिली आहे. त्यामध्ये, आज सकाळी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी नोटीस न देता अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली मोठे नुकसान केले आहे. जेसीबी चालक संजय यशवंत शेवाळे (रा. वाटेगाव) यांनी जेसीबी (क्र. एमएच १0— जे— ७६७४) द्वारे हे नुकसान केले आहे. आम्ही अल्पसंख्याक कुटुंबातील असून, या व्यवसायावर आमचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आमच्यावर प्रचंड दहशत निर्माण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पालिकेने अचानकपणे या परिसरातील हमीदिया स्टोअर्स, न्यू जनता मेडिकल, बाँबे स्टिल या दुकानासमोरील छपऱ्या, भिंत, पायऱ्या काढण्यास सुरुवात केल्यावर तेथे मोठी गर्दी जमली. काही वेळात तेथे प्रभागातील नगरसेवक कपिल ओसवाल, विरोधी पक्षनेते विजय कुंभार, माजी नगरसेवक विक्रम पाटील, काँग्रेसचे विजय पवार, मनसेचे सनी खराडे, युवाशक्तीचे सोमनाथ फल्ले व त्यांचे कार्यकर्ते जमा झाले. या सर्वांच्या उपस्थितीने ही अतिक्रमण मोहीम थांबली.
यावेळी तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांनी ही मोहीम थांबवल्यावर जेसीबी चालकाला घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुयश जोशी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
आकस्मिक कारवाईमुळे तणाव
पालिकेने अचानकपणे या परिसरातील हमीदिया स्टोअर्स, न्यू जनता मेडिकल, बाँबे स्टिल या दुकानासमोरील छपऱ्या, भिंत, पायऱ्या काढण्यास सुरुवात केल्यावर तेथे मोठी गर्दी जमली. व्यापारी या कारवाईने संतप्त झाले होते. काही वेळात तेथे सर्वपक्षीय कार्यकर्ते व काही नगरसेवक जमा झाले. त्यांच्या उपस्थितीने ही अतिक्रमण मोहीम थांबली. यावेळी तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.