विश्वजित कदम यांच्यामुळे घाटमाथ्यावर रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:20+5:302021-06-23T04:18:20+5:30
गेल्या दोन निवडणुकीत घाटमाथा संस्थापक पॅनेलचा बालेकिल्ला ठरला हाेता. यंदा मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत ...

विश्वजित कदम यांच्यामुळे घाटमाथ्यावर रंगत
गेल्या दोन निवडणुकीत घाटमाथा संस्थापक पॅनेलचा बालेकिल्ला ठरला हाेता. यंदा मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.
कडेगाव, खानापूर व पलूस तालुक्यांतील तेवीस गावांत ३९०० मतदार हाेते. यातील जवळपास १३०० मतदारांचे निधन झाले आहे, तर अनेक सभासदांनी ऊस नेला जात नाही, साखर मिळत नाही, असे सांगत राजीनामे दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घाटमाथ्यावरील मतदानात मोठी घट झाली आहे. सत्ताधारी गटाने सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात सभासद घटवले. मृत सभासदांच्या वारस नोंदी न केल्याने घाटमाथ्यावरील सभासद संख्या ५० टक्के घटली आहे. सोनहिरा परिसरात कृष्णा कारखान्याचे सभासद अधिक आहेत. हा परिसर कदम गटाचा बालेकिल्ला आहे. गेल्या दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक विश्वजित कदम यांनी जास्त मनावर घेतली असल्याने चौफेर कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
देवराष्ट्रे गावात ४२७ मतदान असून, याच गावात रयत पॅनेलचे बापूसाहेब पाटील, सहकारन पॅनेलचे बाबासाहेब शिंदे, संस्थापक पॅनेलचे माणिक मोरे यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
चौकट
वारस नाेंदीचा प्रश्न गंभीर
गेल्या पाच वर्षांत घाटमाथ्यावरील जवळपास १३०० सभासदांचे निधन झाले आहे. त्यांच्या वारस नोंदी कारखान्याने घेतल्या नसल्याने मृत वारस नोंदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.