अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे पाणीटंचाई
By Admin | Updated: September 13, 2015 22:14 IST2015-09-13T21:51:24+5:302015-09-13T22:14:27+5:30
आटपाडीत स्थिती गंभीर : जुन्या मोटारी जळाल्या; नव्या योजनेला वीज कंपनीचे ‘कनेक्शन’च नाही

अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे पाणीटंचाई
अविनाश बाड -आटपाडी --विजेच्या कमी-जास्त दाबामुळे आटपाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या मोटारी जळाल्या आहेत. आधीच ८ ते १० दिवसांतून एकदा मिळणाऱ्या पाण्यामुळे आटपाडीकर वैतागले असताना, वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे येथील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. भारत निर्माण योजनेतून तब्बल १६ कोटी ६ लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणी पुरवठ्यासाठी सज्ज असलेल्या योजनेला जुन्या पाणी योजनेच्या थकबाकीचे कारण पुढे करून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडण्यास नकार दिला आहे.
सध्या आटपाडी तलावाखालील विहिरीत तलावातील पाणी सोडून ८ ते १० दिवसांतून एकदा अत्यंत गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. जुनाट यंत्रणेमुळे नागरिकांसह कारभाऱ्यांचेही पाण्याने हाल सुरू केले असताना, शुक्रवारी तारा तुटल्या, त्यावेळी २० अश्वशक्तीची ग्रामपंचायतीची पहिली मोटार जळाली. त्यानंतर दुसरी आणि शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विजेच्या कमी-जास्त दाबामुळे तिसरी मोटारही जळाली. २० अश्वशक्तीच्या तिन्ही मोटारी २० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या आटपाडीत दुरुस्त होईनात, म्हणून कारभाऱ्यांनी सांगली गाठली. त्यामुळे आटपाडीकरांवर पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आणली आहे.
वास्तविक या मोटारी दुरुस्त झाल्या तरी आटपाडीची पाणीटंचाई दूर होऊ शकत नाही. त्यासाठी भारत निर्माण योजनेतून केलेली नवी योजना तात्काळ सुरू होण्याची गरज आहे. ही योजना सध्या आटपाडीला जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी पुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. आटपाडी तलावातून विहिरीसह जॅकवेल व त्यातील ४० अश्वशक्तीचे दोन पंप आणि जलशुद्धीकरण प्रकल्पातील ३५ अश्वशक्तीचे दोन पंप बसवून दोन महिने झाले. ९० आणि ५१ अश्वशक्तीचा वीजपुरवठा करण्यासाठी तिथे दोन डीपी बसवून १० दिवस झाले. आता फक्त वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या डीपीना विजेचे कनेक्शन जोडणे बाकी आहे. तलावातील पाणी सध्या पिण्यासाठी आरक्षित केल्याने आवश्यक तेवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.
आटपाडी हे तालुक्याचे गाव. ग्रामस्थ पाणी-पाणी करीत असताना, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या पाणी पुरवठा योजनेची थकित वीज बाकी वसुलीची ही नामी संधी समजली आहे. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ९७ लाख वीज बिल थकित असल्याचे वीज कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, तर एवढे बिल ग्रामपंचायत प्रशासनाला मान्य नाही.
वीज कंपनीची वीज बिलापोटीची जी काही वसुली असेल, ती ग्रामपंचायतीने द्यायलाच हवी. पण ३२ हजार ७८० एवढी लोकसंख्या असलेल्या आटपाडीतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल करून वीज बिलाची वसुली परकीय इंग्रजांनी सुद्धा केली नसती. लोकांना गढूळ पाणी पिल्यामुळे पोटाचे आजार वाढत असताना, ते पाणीही आता वीज कंपनीच्या वसुलीबहाद्दर अधिकाऱ्यांमुळे मिळणे मुश्कील झाले आहे. सरकारने केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला वीज कनेक्शन न जोडणाऱ्या वीज कंपनीच्या बेफिकीर अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शुद्ध पाण्याची प्रतीक्षा
आटपाडीतील पाणी टंचाईला वैतागून येथील काही सामाजिक संघटनांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आटपाडी पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन आंदोलकांना शांत केले. सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाऊन इथल्या लोकांमध्ये कमालीची सोशिकता आली आहे. त्यामुळे जीवघेणी पाणीटंचाई निर्माण होऊनही नागरिक पावसाच्या अपेक्षेप्रमाणे ही भीषण पाणी टंचाई नष्ट होण्याची वाट मोठ्या आशेने पाहत आहेत.