Due to rising drought, severe water shortage in Sangli district | दुष्काळाची दाहकता वाढली- सांगली जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई
दुष्काळाची दाहकता वाढली- सांगली जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई

ठळक मुद्दे७५ गावे, ४९९ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी

 सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढली असून, ७५ गावे आणि ४९९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ५९ हजार नागरिकांना ६९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने १९ कोटी १५ लाख ८५ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्यामुळे पशुधनाच्या चाºयाचा जिल्ह्यातील प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यावर प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात ६० टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. यामध्ये नऊ टँकरची भर पडली आहे. सध्या पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया गेली आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळी स्थिती वाढू लागली असल्याने जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने उपाययोजना केल्या जात आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७५ गावे, ७३४ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ५९ हजार लोकसंख्येला ६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जत तालुक्यातील ३४ गावे आणि २७९ वाड्या-वस्त्यांना ३८ टँकरने, आटपाडीतील २२ गावांमधील १७२ वाड्या-वस्त्यांना १८ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना सहा टँकरने, तासगावमधील तीन गावे आणि १३ वाड्या-वस्त्यांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील १० आणि ४७ वाड्या-वस्त्यांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मार्चअखेर १६९ टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे, परंतु ते जादा दराने खरेदी करून जनावरांना जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात टँकरने : पाणी पुरवठा
तालुका गावे वाड्या-वस्त्या लोकसंख्या टँकर
जत ३४ २६७ ९७१०७ ३८
क़महांकाळ १० ४७ १३७७२ ६
तासगाव ३ १३ २१६४ १
खानापूर ६ ० १२२१४ ६
आटपाडी २२ १७२ ३४४५५ १८
एकूण ७५ ४९९ १५९७१२ ६९पाण्यासाठी आंदोलने सुरूच
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात अजूनही अनेक गावांमध्ये टँकरची मागणी होत आहे. त्यासाठी आंदोलनेही करण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दुष्काळग्रस्तांना सतावत आहे.

Web Title: Due to rising drought, severe water shortage in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.