दर घटल्याने द्राक्षोत्पादकांमध्ये चिंता
By Admin | Updated: February 19, 2015 23:40 IST2015-02-19T23:27:32+5:302015-02-19T23:40:01+5:30
मिरज, कवठेमहांकाळ तालुका : व्यापाऱ्यांनीच पाडले दर

दर घटल्याने द्राक्षोत्पादकांमध्ये चिंता
प्रवीण जगताप - लिंगनूर -सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुक्यातून पिकविल्या जाणाऱ्या द्राक्षांचे व बेदाण्याचे दर सध्या उतरू लागले आहेत. व्यापाऱ्यांनी वेगवेगळी कारणे दाखवत दर उतरवल्यामुळे द्राक्षे व बेदाणा उत्पादकांत चिंतेचे वातावरण आहे. द्राक्षाचा दर १२० ते १७० रुपये चार किलोस असा सुरू आहे, तर बेदाण्याच्या सुरूवातीला असणाऱ्या व सध्याच्या दरात मोठी तफावत दिसत आहे.मिरज पूर्व भागातील जवळपास ३० गावे अन् वाड्या-वस्त्यांवरील शिवारात द्राक्षबागा फुलल्या आहेत. द्राक्षबागांचे क्षेत्रही वाढत आहे. मात्र गतवर्षी असणारा बेदाण्याचा २०० ते ३०० रुपयांपर्यंत गेलेला दर यावर्षी राहतो की नाही, याची चिंता उत्पादकांना लागली आहे. बाजारपेठांकडे पाठविण्यात येणाऱ्या द्राक्षांचे दरही गतवर्षीच्या तुलनेत घटले आहेत. सुरुवातीला ३०० रुपयांपर्यंत द्राक्षांना मिळणारा दर यावर्षी २३४ ते २६० पर्यंतच मिळाला. तोही मोजक्या व आगाप छाटणीच्या द्राक्षबागांना. सप्टेंबर व आॅक्टोबर छाटणीच्या बागांना २३० पासून १७० रुपयांपर्यंत उतरणाऱ्या दरातच द्राक्षांची विक्री करावी लागली आहे. त्यामुळे सर्वच द्राक्ष उत्पादक यंदा घाट्यात आहेत. यंदा छाटणीनंतर फळ लागण झाल्यापासून फळात पाणी उतरेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने दावण्या, कूज, चमक कमी होणे, बुरशी या समस्यांचा सामना करावा लागला. पावसामुळे चमक उतरलेल्या द्राक्षांचे दर पडू लागल्याने अशा बागायतदारांनी अचानक बेदाणा निर्मितीचा निर्णय घेतला. परंतु तिथेही बेदाण्याच्या घसरणाऱ्या दराची भीती तयार झाली आहे.
बेदाण्याचे दर १२० ते १८० रुपयांच्या सरासरीनेच मिळत असल्याने, द्राक्ष व बेदाणा उत्पादकांवर सर्व बाजूंनी संकट आले आहे. अशात बेदाणा स्टोअरेजला ठेवण्याचे भाडेही परवडत नसल्याने व पुन्हा बेदाणा दराची खात्री नसल्याने निर्णय घेणेही कठीण झाले आहे.