पावसामुळे दीड हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पाण्यात
By Admin | Updated: October 29, 2014 00:14 IST2014-10-28T22:57:32+5:302014-10-29T00:14:30+5:30
उत्पन्नातही घट : वाळव्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका

पावसामुळे दीड हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पाण्यात
आष्टा : पावसामुळे वाळवा तालुक्यातील दीड हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकामध्ये पाणी साचून राहिले आहे. यामुळे येथील सर्व सोयाबीन भिजल्यामुळे कुजले आहे. मळणी सुरु असलेले सोयाबीनही आष्टा परिसरात भिजले आहे.
वाळवा तालुक्यात १५ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली होती. पैकी यातील १० टक्के क्षेत्रावर उशिरा पेरणी केल्याने या क्षेत्रावरील सोयाबीन अवेळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाऊस व खराब बियाणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. वाळवा तालुक्यात जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात सोयाबीनची लागवड करण्यात आली. काहींनी उसातही सोयाबीन टोकणी केली. ऊसक्षेत्रामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात घट होत आहे. मागील काही वर्षांत सोयाबीन काढणीवेळी पाऊस झाल्याने प्रतिवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दिवाळीमुळे यातील बहुतांशी सोयाबीन काढण्यात आले आहे. प्रतिवर्षी एकरी २० ते २५ पोती सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यास १० ते १२ पोती सोयाबीन निघाले आहे, तर एकरी २ ते ३ पोतीही उत्पादन मिळाले आहे. निकृष्ट बियाणे व नियमित पाऊस यामुळे ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी उशिरा सोयाबीन लागवड केल्याने या शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसातच अडकले आहे. ते भिजल्यामुळे क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांचा फटका बसणार आहे. (वार्ताहर)
गोटखिंडीत सोयाबीनचे उत्पादन घटले
आष्टा : शेतकऱ्यांसाठी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचा उत्पादन उतारा यावर्षी कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पिकासंबंधी नाराजी पसरली आहे.
गोटखिंडी परिसरात बावची, भडकंबे परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात असते. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनचे आगाऊ टोकण होत असते. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या मध्यंतरी सतत पडलेला पाऊस, त्यामुळे तणांचा वाढता प्रादुर्भाव, वातावरणाच्या फेरबदलामुळे तांबेरासारख्या रोगांचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसत होता. या सर्वांचा परिणाम म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांचे उत्पादन पूर्वी कोलमडले आहे. बहुतांशी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी झालेला खर्चसुद्धा उत्पादनामधून मिळलेला नाही.
दीपावली सणासाठी सोयाबीन विक्रीतून आलेला पैसा वापरायचा, असे शेतकऱ्यांचे नियोजन असते. परंतु घटलेल्या उत्पादनामुळे दीपावली सणासाठी हात आखडता घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऊस बिलाचा दीपावली हप्ताही नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)