गणेशोत्सवातही मागणी कमी असल्याने फुलांचे दर कोमेजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:20+5:302021-09-06T04:30:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : गणेशाचे आगमन होणार असतानाही फुलांचे दर कमी असल्याने मिरजेच्या बाजारात फुलांची आवक घटली ...

गणेशोत्सवातही मागणी कमी असल्याने फुलांचे दर कोमेजले
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : गणेशाचे आगमन होणार असतानाही फुलांचे दर कमी असल्याने मिरजेच्या बाजारात फुलांची आवक घटली आहे. झेंडूचा दर केवळ दहा रुपयांवर असल्याने झेंडू टाकून देण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवात व दसऱ्यात फुलांचे दर वाढण्याची प्रतीक्षा आहे.
चार महिने लाॅकडाऊन व त्यानंतर महापूर व आता मागणीअभावी बाजारात फुलांची आवक कमी आहे. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात वाढ होते. मात्र, गणेशोत्सव दोन दिवसांवर आला तरी निशिगंध वगळता फुलांचे दर अद्याप कमी आहेत. मिरज व परिसरात झेंडू उत्पादकांची संख्या मोठी आहे. मात्र, गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत झेंडूला चांगला दर मिळतो. यावर्षी मुंबईसह मोठ्या शहरात मागणी नसल्याने झेंडूचा दर पडला आहे. झेंडू केवळ दहा रुपये प्रतिकिलो असल्याने झेंडू टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मिरजेतील फुलांच्या बाजारात निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांचीही आवक होते. मात्र, मागणीअभावी दर घटल्याने बाजारात फुलांची आवक कमी आहे.
स्थानिक विक्रीसह मिरजेतील बाजारातून कर्नाटकात फुलांची निर्यात होते. मात्र, कर्नाटकात एस. टी. वाहतूक बंद असल्याने त्याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. हरितगृहात उत्पादन होणाऱ्या फ्रेंच गुलाब, जर्बेरा व कार्नेशिया या फुलांची मिरजेतून कोकण, गोव्यात निर्यात होते. मात्र, फुलांना मागणी कमी असल्याने निर्यातीतही घट झाली आहे. झेंडू, गलाटा, शेवंती वगळता निशिगंधाचे दर वाढले आहेत. मिरजेत फुलांच्या एकमेव बाजारात आवक कमी असल्याने उलाढाल घटली आहे. गेल्या चार महिन्यांत लाॅकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्यांनी फुलांच्या बागा काढून टाकल्या. आता फुलांना मागणी नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. गणेशोत्सवात हारासाठी गलाट्याच्या फुलांचा वापर होतो. मात्र, गलाटा फुलांचेही दर कमी आहेत. पुढील काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरवाढीची प्रतीक्षा असल्याचे व्यापारी पंडित कोरे यांनी सांगितले.
चौकट
फुलांचे दर
निशिगंध : २०० रुपये किलो
झेंडू : १० रुपये किलो
गलाटा : ५० रुपये किलो
गुलाब : २५० रुपये शेकडा
जर्बेरा : १० फुलांची पेंडी ३० रुपये
शेवंती : ५० रुपये किलो