लॉकडाऊनमुळे मागणीअभावी फुले कोमेजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:36+5:302021-04-18T04:25:36+5:30
मिरज : संचारबंदी सुरू झाल्यानंतर मिरजेत बाजार समितीच्या फुलबाजारात फुलांचे दर कोसळले आहेत. सर्वच फुलांचा दर दहा ...

लॉकडाऊनमुळे मागणीअभावी फुले कोमेजली
मिरज : संचारबंदी सुरू झाल्यानंतर मिरजेत बाजार समितीच्या फुलबाजारात फुलांचे दर कोसळले आहेत. सर्वच फुलांचा दर दहा रुपयावर आला असून ग्राहक नसल्याने फुले टाकून देण्याची वेळ आली आहे. यावर्षी उत्पादन चांगले असूनही ऐन लग्नसराईत मागणीअभावी फुले कोमेजल्याने फटका बसला आहे.
दरवर्षी मार्च व एप्रिलला लग्नसराईमुळे फुलांना चांगला दर मिळतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी यात्रा, जत्रा रद्द झाल्या. लग्नसराईतच विवाह कार्यक्रमांवर निर्बंध येऊन फुलांच्या मागणीत घट झाली. गेल्या महिन्यापासून भाव निम्म्याने खाली आले. त्यानंतर एप्रिलमध्ये संचारबंदी सुरू झाल्यानंतर उलाढाल थंडावली आहे. तीनशे रुपये शेकडा दर असलेल्या गुलाबाची फुले दहा रुपयांना मिळत आहेत. चारशे रुपये किलोने विक्री होणारी शेवंती, मोगरा, जरबेरा, कार्नेशिया, गलांडा, लिली यासह कोणत्याही फुलांना मागणीच नाही. परिणामी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले टाकून देण्याची वेळ आली आहे. लाॅकडाऊनमुळे कर्नाटकात होणारी फुलांची निर्यातही बंद झाली आहे. गजऱ्यांनाही मागणी नाही.
मिरजेतील मार्केट यार्डातील फुलबाजारात जिल्ह्यातून विविध प्रकारची फुले विक्रीसाठी येतात. किरकोळ विक्रेते खरेदी करतात. बाजारातून कर्नाटकासह मोठ्या शहरातही निर्यात होते. मात्र लॉकडाऊनमुळे पुन्हा गेल्या वर्षीसारखीच परिस्थिती झाली आहे. लग्नसराई लाॅक झाल्याने व यापुढे मोठे सण, उत्सव नसल्याने फुलांना दर मिळण्यासाठी जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चाैकट
कोरोनामुळे गतवर्षीही बाजार बंद होता. यावर्षी बाजार सुरू आहे, मात्र फुलांची व इतर दुकाने बंद आहेत. लग्नकार्यावर बंधने आहेत. यामुळे फुले तोडून बाजारात आणण्याचा खर्चही निघत नाही. विक्री न झालेली फुले कचऱ्यात टाकून शेतकरी परत जात असल्याचे फुलविक्रेते पंडित कोरे यांनी सांगितले.