पावसाअभावी जिल्ह्यात दूध उत्पादनात घट
By Admin | Updated: September 24, 2015 23:58 IST2015-09-24T22:40:07+5:302015-09-24T23:58:54+5:30
पशुधन घटल्याचा परिणाम : तीन महिन्यात दीड लाख लिटर उत्पादन कमी

पावसाअभावी जिल्ह्यात दूध उत्पादनात घट
सदानंद औंधे - मिरज--पावसाअभावी जिल्ह्यातील दूध उत्पादनात घट झाली आहे. जून ते आॅगस्ट या तीन महिन्यात दूध उत्पादन दीड लाख लिटर कमी झाले आहे. जिल्ह्यात दरमहा १५ लाख लिटर दूध उत्पादन होते. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधित जनावरांना भरपूर चारा उपलब्ध होतो. मात्र या काळात दूध उत्पादन स्थिर असते. मात्र यावर्षी अवर्षणामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. जून महिन्यात साडेचौदा लाख लिटर असलेले दुधाचे उत्पादन आॅगस्ट महिन्यात तेरा लाखावर आले आहे. सप्टेंबर महिन्यात उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गजानन तावडे यांनी सांगितले. दूध उत्पादन घटले असले तरी, दुधाला मागणी व दर नसल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीतच आहे. जिल्ह्यातील सहकारी व खासगी दूध संघ, दूध संकलन करुन दुधावर प्रक्रिया करतात. प्रक्रिया केलेले दूध पुणे व मुंबईला निर्यात करण्यात येते. दूध पावडरला दर नसल्याने दूध पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. पावडरचे उत्पादन बंद असल्याने दुधाला मागणी नसल्याचे चित्र आहे.
३० कोटी आकस्मिक निधीतून
महाराष्ट्रातील पाच लाख लिटर अतिरिक्त दूध प्रति लिटर २२ रुपये दराने खरेदी करून मिरजेच्या शासकीय दूध योजनेकडे पाठविण्यात आले होते. या दुधावर इंदापूर येथे खासगी डेअरीत प्रक्रिया करुन ४ हजार ९३० टन दूध पावडर, २५४५ टन बटर उत्पादन करण्यात आले. राज्यातील ३२ दूध संघांकडून शासनाने खरेदी केलेल्या अतिरिक्त दुधाचे ३० कोटी रुपये बिल देण्यासाठी तरतूद नसल्याने दूध संघाचे देणे रखडले होते. राज्यात अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने दुग्ध विकास विभागाने आकस्मिक निधीतून ३० कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. मिरज शासकीय दूध योजनेमार्फत दूध संघांना ३० कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.