नोटा नसल्याने सामान्यजन मेटाकुटीस
By Admin | Updated: November 15, 2016 00:31 IST2016-11-14T23:39:09+5:302016-11-15T00:31:07+5:30
बॅँका बंद असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ-- एटीएम केंद्रांमध्ये ठणठणाट- नोटांच्या समस्येमुळे शांतता कष्टकरी वर्गालाही आर्थिक संघर्ष
नोटा नसल्याने सामान्यजन मेटाकुटीस
सांगली : केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या चलनातील वापरावर लादलेल्या निर्बंधाला आठवडाभराचा कालावधी होत आला, तरी नागरिकांचे हाल थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे.
शनिवारी व रविवारी सलग दोन्ही दिवस ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू असल्याने बॅँकांना सोमवारी सुटी दिली होती. सोमवारच्या सुटीमुळे अनेक ग्राहकांना बॅँकेसमोरून रिकाम्या हाताने परतावे लागले. दरम्यान, रविवारी बऱ्यापैकी सेवा दिलेल्या एटीएम केंद्रांमध्ये सोमवारी मात्र पैशाचा ठणठणाट होता. शहरातील केवळ दोन ते तीन बॅँकांचीच एटीएम यंत्रणा सोमवारी सुरू होती. येथीलराजवाडा चौकातील एका बॅँकेच्या एटीएमवर रात्री आठच्या सुमारास रक्कम उपलब्ध झाल्याने, तेथे रात्रीसुध्दा शंभरावर नागरिकांनी रक्कम काढण्यासाठी गर्दी केली होती.
गुरूवारपासून अखंडपणे ग्राहकांना नोटा बदलून देण्यासाठी बॅँका सुरू आहेत. त्यात सकाळी आणि सायंकाळी जादा वेळेत बॅँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना नोटा बदलून देण्याचे काम सुरू असले तरी, रिझर्व्ह बॅँकेकडूनच जिल्ह्यासाठी कोटा कमी येत असल्याने वारंवार नोटांचा तुटवडा भासत आहे. त्यात शुक्रवारी दोन हजार रूपयांच्या नवीन नोटा उपलब्ध झाल्या. पण त्यांचा मर्यादित पुरवठा करण्यात येत आहे. कारण ज्या ग्राहकांना या नोटेचे वितरण करण्यात आले आहे, तेच ग्राहक पुन्हा बँकेत ती दोन हजार रुपयांची नोट घेऊन सुटे मागण्यास गर्दी करत आहेत. त्यामुळे कमी रक्कम असलेल्या ग्राहकांना त्याचे वितरण करण्यात येत आहे.
सोमवारी जिल्ह्यातील सर्व बॅँकांना सुटी होती. याबाबत अनभिज्ञ असलेले अनेक ग्राहक सोमवारीही सकाळी बॅँकांसमोर येऊन थांबले होते. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना सुटीबाबत कल्पना दिल्यानंतर अस्वस्थ होत ग्राहकांनी घरचा रस्ता धरला. बॅँकांबाहेर वाढत चाललेल्या गर्दीमुळे आता अनेक ग्राहक नोटा बदलून घेण्याऐवजी, ती रक्कम खात्यावर भरून, एटीएम कार्ड अथवा धनादेशाद्वारे व्यवहार पूर्ण करत आहेत. या आठवडाभरात धनादेश पुस्तक मागण्यासाठी बँकांत ग्राहकांची संख्या वाढल्याची माहिती बॅँक अधिकाऱ्यांनी दिली.
साडेनऊ कोटींचे करायचे काय?
महापालिकेत खलबते : दर्जेदार कामासाठी आयुक्तांचा आग्रह
सांगली : पाचशे व हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा करापोटी स्वीकारून महापालिका मालमाल झाली आहे. यातून गेल्या चार दिवसात तब्बल साडेनऊ कोटींचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. सोमवारी शेवटच्या दिवशीही दीड कोटीचा गल्ला जमा झाला आहे. या साडेनऊ कोटीचे करायचे काय, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे, यावर प्रशासकीय स्तरावर आता खलबते सुरू झाली आहेत. सोशल मीडियावरून अनेकांनी आयुक्तांना, दर्जेदार काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. आयुक्तांनी तसाच आग्रह धरला असून, सर्व अधिकारी, खातेप्रमुखांना सूचना पाठवून लोकभावना कळविल्या आहेत.
महापालिकेच्या करांपोटी पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय चांगलाच पथ्यावर पडला आहे. गेल्या चार दिवसात पालिकेच्या तिजोरीत तब्बल ९ कोटी रुपये जमा झाले आहेत. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कर वसुलीसाठी नियोजन केल्याने थकबाकीचा आकडा बऱ्यापैकी कमी होण्यास मदत झाली आहे. शिवाय मार्च महिन्यात होणाऱ्या वसुलीचा ताणही कमी झाला आहे. राज्य शासनाने सोमवारी मध्यरात्रीपर्यंत करापोटी पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली होती. पहिल्यादिवशीच साडेचार कोटीचा पल्ला महापालिकेने गाठला होता. त्यानंतर प्रत्येकदिवशी दीड कोटीचा कर तिजोरीत जमा होत होता. सोमवारीसुद्धा दीड कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली.
खुद्द आयुक्त खेबूडकर यांनीही लोकभावनेची कदर करीत नागरिकांच्या सूचनांवर अंमल करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी सर्व खातेप्रमुख, अधिकाऱ्यांना सोशल मीडियावरून संदेश पाठवित, लोकभावना काय आहेत, याची जाणीव करून दिली आहे. तसेच भविष्यातील कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यात कुचराई झाल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे अधिकारी, खातेप्रमुखही सावध प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
सोमवारी जुन्या नोटा स्वीकारण्याची अंतिम मुदत होती. मंगळवारपासून ही सोय बंद हा
ेणार असल्याने वसुलीत घट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार जुन्या थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम या विभागाकडून हाती घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
सांगली जिल्हा बॅँकेच्या कामकाजावर मोठा परिणाम
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल गेल्या चार दिवसांत वारंवार बदलल्या गेलेल्या रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अस्वस्थता पसरली आहे. ग्रामीण अर्थकारणाशी जवळचा संबंध असलेल्या जिल्हा बॅँकेचे कामकाज मंगळवारपासून पुन्हा ठप्प होणार आहे.
जिल्हा बॅँकेने १० नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशानुसारच पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याबरोबरच त्या बदलून देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अचानक दुपारी राज्य बँकेने मेलद्वारे ही प्रक्रिया थांबविण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा बँकांना दिले आणि त्यानंतर पुन्हा शुक्रवारी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. दोन दिवसांपासून प्रक्रिया सुरू असतानाच, सोमवारी पुन्हा रिझर्व्ह बॅँकेने निर्बंध घातले. ग्रामीण भागात बहुतांश कुटुंबांची खाती ही जिल्हा बॅँकांच्या शाखांमध्येच आहेत. तोसुद्धा मार्ग बंद झाल्याने ग्रामीण भागात नाराजीचा सूर उमटत आहे. (प्रतिनिधी)